सोमवार, ३० जुलै, २०१२

तू आज नाही आलास


तू आज नाही आलास
... उद्या येशील !!
उद्या नाही .....
तर परवा येशील ...!!

पण आज ना उद्या
तुला यावंच लागेल ...
हे तुलाही माहित आहे आणि मलाही.

पण असे किती दिवस आणि किती महिने
तू कोरड्याने तुडवत जाणार आहेस ...?
तुझ्या करड्या नी कोरड्या पावलांच्या
टाचेखाली काय काय तुडवत चाल्लायस...
हे एकदा ओल्या नजरेने पाहून तरी घे ...
ये ....

तू येशीलच कधीतरी ...
हे नक्की ...
पण वरातीमागून यावेत घोडे
तसा येऊन उपयोग काय ....?
तहानलेली माती आणि
तहानलेली गोठ्यात गाय ....!!

आभाळभर पाखरं आहेत ...
नभ आहे ... वारा आहे ...
सारं.....सारं... सारं आहे ....
फक्त नाहीस तो तू.

आणि तुझ्याशिवाय काहीच नाही
हे तुलाही माहित आणि मलाही


नक्षत्रांच्या कोरड्या दिठीशी


नक्षत्रांच्या कोरड्या दिठीशी
फुटकी ओंजळ .. तुटकी वेल
अन् राजाच्या खुर्चीपुढती
लिहिले कोणी सारे आलबेल

या खेपेला नाही आला
त्या खेपेला येईल म्हणून
ओसरीतल्या बाजेवारची
म्हातारी मेली कण्हून कण्हून

कोण सांगतो भविष्य इथले
कोणाच्या ओठी जयजयकार
तिथे रडवेला होतो तान्हा
इथे माजतो हाहाकार

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

पाऊस झरताना झाडीचा

पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

रानामधल्या धानावरून
पाणी गाणी गात ओघळताना
ताटांच्या पानांवरून ताटात
गुद्गल्या करत उतरताना
गार भरल्या रानावनात
आपला नाद घुमवीत जातो...
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

थरारत तू झाडाखाली
चिंब चिंब होत जातेस
नंतर तुला भान नसतं
चिखलातून चालत राहतेस
झरझर धार झरतानाही
तुझा असून तुझा नसतो
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

शेन काढ ... चारा घाल
तुझी कामं चालूच असतात
गुरं मात्र गोठ्यामधली
अजिबात भिजत नसतात
माझं हसणं साहवत नाही
तुला आपला छेडीत जातो
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....



- गजानन मुळे
www.facebook.com/kadhichaithemi

मधून

रविवार, २४ जून, २०१२

विठू तुझ्या भजनात

विठू तुझ्या भजनात
मळा नाही दंग आज
अभंगाच्या चालीवर
दुभंगला पखवाज

आभाळात नाही पाणी

ढेकळात उभा बाप
डोळियात निज नाही
ओठावर तुझा जप

कोरड्ल्या विहिरीत
कोरडला जीव
कीर्तनात - भजनात
भिजलेला देव

उरलेल्या पावसाला
आता विखाचाच विडा
तुझ्या मात्र अंगणात
अभंगांचा सडा

ओसाड गाव माझा
तिथे तल्लीन पंढरी
वारीत भिजायला
चालला वारकरी

पडला पाऊस
दूर डोंगराच्या देशी
इथे तुझ्या स्वागताला
सजलेल्या वेशी

नको होऊस आंधळा
रे गरीबाच्या देवा
पसाभर ओंजळीत
थोडे पाणी तरी ठेवा

- गजानन मुळे

शनिवार, २३ जून, २०१२

मी विसरून गेलोय

मी विसरून गेलोय
रिमझिम पावसाची
चार चार दिवसांची
अविरत झड.
मला आठवत नाही आता
कधी कधी संध्याकाळी
गप्पांच्या गाण्यामध्ये भिजणारा
पाराचा भलामोठा वड.
असा कितीसा काळ लोटलाय या अशा गोष्टींना
आत्ता आत्ताचीच तर आठवण आहे ही.

पण
काळासोबत प्रवाहाच्या दिशा बदलल्या
आणि वाऱ्याच्याही.
आता आठवण्याचा प्रयत्न करत
बसून राहावं गच्चीवर
इतकंच हाती उरलंय माझ्या.

कारण पाऊस पडू लागला की
आपणहून भिजायला जावं लागतंय.
...कुणास ठाऊक पुन्हा भेटेल की नाही.
तो भर रस्त्यात भेटण्याची...
आपसूक भिजण्याची मजा काही औरच.
आता जमवावा लागतो मेळा
वेळा वगैरे ठरवून.

तशी कुणालाच उसंत नाही
... पावसाला अन् माणसांनाही.

कुणास ठावूक
सगळे कुठे गुंतलेत...!!!


- गजानन मुळे
www.facebook.com/kadhichaithemi

मंगळवार, १ मे, २०१२

संभ्रम



कधीतरी पायांखालची वाळू सरकते अचानक
तेव्हां आस्तिक – नास्तिकाच्या पुसटशा सीमारेषेवर
मी उभा असतो हात मोकळे सोडून.

समोर बुडत असतो सूर्य क्षितिजाच्या समुद्रात
आणि दुसऱ्याच क्षणाला दाटत असतो काळोख
तेव्हां डोळे चाचपडतात अंधाराचं दाट धुकं.

आहेच कुणीतरी पाठीशी ...असा भासच असेल ...
पण अजाणतेपणी पावलांमागून पावलं पडताना ..
या पुढचा रस्ता आपला...फक्त आपलाच वाटताना...
मागे वळून पहात नसताना...
पाठीवरचा हातही आपलाच असताना ...
झोपेत कुणीतरी चेहऱ्यावरून फिरवलंच असेल मोरपीस
असं वाटतं उगाच ... खरं ...खोटं ... उठल्यावर....

‘बिटवीन द लाईन’ नसले जरी संवाद ...
असतंच काहीतरी मौनाच्या पडद्याआड ...
एखादं बहरलेलं झाड .. किंवा खोल खोल आड ...
काहीतरी असतंच नक्की ..
काय असतं ...?
फुल, फुलपाखरू, वारं की कोरडाठाक तळ..?

  
कधीतरी पायांखालची वाळू सरकते अचानक
तेव्हां आस्तिक – नास्तिकाच्या पुसटशा सीमारेषेवर
मी उभा असतो हात मोकळे सोडून.
मी खरा नास्तिक की आस्तिक ..?
हा प्रश्न सोडवित ...
अनुत्तरीत....!

नास्तिक




तो देवळात जाऊन कधी घेत नसेल दर्शन देवाचं
पण माणसांच्या गर्दीत हरवलेला देव शोधत असतो रोज.

तो सुर्याला फक्त सूर्य मानतो, चंद्राला फक्त चंद्र,
पण सूर्याच्या अखंड उर्जेबद्दल त्याला प्रचंड कुतूहल आहे.

तो शेंदूर थापल्या दगडांसमोर लीन होत नसेल कधी
पण नतमस्तक असतो सदैव लोकोत्तरांसमोर.

कामासाठी तो कधी मुहूर्त – बिहर्त बघत नसला तरी
प्रत्येक काम वेळेवर करण्यासाठी दक्ष असतो नेहमी.

दैवावर त्याचा नसला जरी भरवसा तरी
प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते हे माहित आहे त्याला.

‘ इह्लोकापार एक स्वर्ग आहे ’ हे मान्य नाही त्याला
पण ‘ पेरेल ते उगवेल ’ ही म्हण तो मान्य करतो.

‘ या जगात देव आहे ’ म्हणणं त्याला निराधार वाटत असलं तरी
निराधारांना आधार द्यायला तो कचरत नाही कधीच.

लोक म्हणतात तो ‘ नास्तिक ’ आहे.
पण मला तर वाटतं तो ‘ आस्तिक ’ आहे.

कारण ..........

तो देवळात जाऊन कधी घेत नसेल दर्शन देवाचं
पण माणसांच्या गर्दीत हरवलेला देव शोधत असतो रोज

कधीचा इथे मी