रविवार, ८ मे, २०१६

आई तू उन्हामध्ये


आई तू उन्हामध्ये
सावलीचं गाणं गायचीस
मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहत राहायचो
.......सावलीचा पदर शोधत.

सावल्यांतल्या कवड्शांना
हातावर नाचवत... झुलवत..
दिवस कधीच निघून गेले
आणि त्यामागून तुही...

फक्त उन्ह होतं तसंच
सावली नसलेल्या जागेवर
कवडसे उरलेच नाहीत.

आता आखं उन्ह जेव्हा
पोळायला लागतं मला
तेव्हां मी तुझं ते गाणं
आठवण्याचा प्रयत्न करतो
पुन्हा पुन्हा.

पण काय सांगू
सूर सापडतात जरा जरा
पण शब्द
निघून गेलेले सावलीला.

मी कवडसे गोळा करण्याचा
तो खेळ विसरून गेलोय.
सावली आता नाहीच कुठे
सर्वत्र उन्ह पोळतच आहे.

आता कधीतरी
आणखीन वाढेल उन्ह...
अन् तयार होईल
एखादी निर्वात पोकळी
त्यात पाचोळ्यासारखा
उडून जाण्याची
मी वाट बघतोय आई.

मी म्हणालो

मी म्हणालो

“ तुला वाचा असून
तू इतका मुका का ?”

तो म्हणाला

“ मी माझ्या शब्दांचं सोनं होण्याची...
लोकांच्या ओठातलं गाणं होण्याची...
माझ्या बोलाची ‘विधानं’ होण्याची...
अमक्याचे ‘उद्गार’ म्हणून ते एखाद्या
वृत्तपत्रात छापून येण्याची...
माझ्या बोलण्याला केवळ बोलणे न होता
त्यांची ‘वक्तव्य’ म्हणून गणना होण्याची...
मी वाट बघतोय.”

“मग जग त्याचं विश्लेषण करेल
मग खरंतर काहीतरी उरेल”

“माझ्या शब्दांच्या धगीनेही कधी
कुणाचे पेटून उठेल रक्त
बस्स ...
त्या क्षणाची मी

वाट पाहतोय फक्त.”

जराच थांब राजसा

जराच थांब राजसा
येऊ दे रे सांजवा
चंद्र ही दिसू देत नि
दिसू दे रे काजवा

रात ही तुझीच रे
तुझाच देह चांदवा
निवू देत दिन जरा
बावरतो रे मनवा

चांदण्यात न्हावूया
आभाळाचे होऊया
मनामागे कुठेतरी
दूरवरी जाऊया

पेटवून रात्र ही
शांतवूया दीप हे
निजल्यावर चंद्र हा
तू मला कवेत घे

पळ ना कळो तुला
ना कळो मला तसाच
पेटत्या कंदिलातली
पुसू नकोस आज काच

शब्द गोठू देत जरा
जराच सरू दे ही रात
चांदण्या उमलू देत
हळू हळू या नभात


उद्ध्वस्त वादळाचे किनारे शोधताना

उद्ध्वस्त वादळाचे किनारे शोधताना
कसा अचानक शब्दांना फुटतो पान्हा
या कवितांचा अर्थ माझा प्राण झाला

आभाळाचा रंग माझ्या डोळीयांना आला 

आता हमरस्त्यावर मांडून संसार

आता हमरस्त्यावर मांडून संसार
डोळ्यात विझलेला गाव घेऊन
पायांखालची जमीन शाबूत ठेवायची.
कधी भेटलेच हाताला काम
तर घामाला किंमत असते म्हणायचं.

नसलेल्या देवाला हाका देवून तरी
काय उपयोग ?
पाणी पापण्यात आहे...
तेवढंच आपल्या हक्काचं

रोज ढाळायचं

आणि मरण टाळायचं.

माझ्याच किनाऱ्यावर

अनिवार उन्हाचा ताप, जसा की शाप, अहिल्येला.
मी उगाच मिटतो डोळे, प्राण तळमळे, गुढ सांजेला.

हातात दिशांचे दान, तसे अपमान, उरलेले ओठी.
काहूर की हुरहूर असे ही, तरीही, उरात घनांची दाटी.

मी शब्द दिलेला, मुग्ध झालेला तुला, सांजेच्या वेळी.
नजरेत भग्न गोपुरे, मुकी वासरे, निष्पर्ण काही ओळी.

अनिवार उन्हाच्या झळा, तसा कळवळा, तुझा गं सखे.
माझ्याच किनाऱ्यावर, करू देत घर, तुझी साजिरी दुःखे.


अंगणात फुललेली

अंगणात फुललेली
महानंदीची जाळी
आभाळाला टाळी
नको देऊ

खांद्यावर ओझे
करपले हात
मुखामध्ये शीत
नको ठेऊ

वाटेवर धूळ
माखले पाऊल
कुणाची चाहूल
घेऊ नको

सांजच्या दाराला
पिकलेला जीव
त्यात आणि हिव
लेऊ नको.


आज तुझ्या कुशीच्या गाभाऱ्यात

आज तुझ्या कुशीच्या गाभाऱ्यात
मला निवांत झोपू दे जरा.
जितके वाहू पहातायत डोळे
तितके वाहू दे जरा.

तुझी बोटे फिरू देत आज
माझ्या केसांतून
आज तुझ्या मिठीतून
मला गाढ लपेटून घे.
आईच्या पदराआड
लपणाऱ्या पोरासारखा. 

आज मला काहीच विचारू नकोस.
आज मला काहीच सांगू नकोस.
मी का रडतोय म्हणून
कोलमडणार नाहीस तू
खात्री आहे मला.
फक्त झीटकारण्याचं पाप
तेवढं करू नकोस आज.

आज मला रडू दे
तुझ्या कुशीत...
माझं सारं भरलेपण
तुझ्या पदरात
रितं करू दे....

एकदाचं.

म्हणजे उद्याच्या
नव्या दुःखासाठी
मी ताजा तवाना होईन.


०९.११.२०१२