बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

किरणशलाका


माझ्या संभ्रम सलील मनात
उन्हाने आवर्तने केलीत.
दवाचे थेंब उडून गेलेत कुठे
काळोखाच्या पालख्यांतून.

आता संध्याकाळ वाटत नाही
ग्रेसच्या कवितेसारखी.
सारखी आठवण येत राहते
पाचोळल्या रानातून हिंडणाऱ्या पावलांची.

आता अनवाणी स्वप्नात
भविष्याची भूते
नाचत नाहीत कधीच.

आताशा पोकळ्यांचे प्रदेशच प्रदेश
विसाव्याला येतात
माझ्या भग्न मंदिराच्या
उद्विग्न गाभाऱ्यात.

जिथे आजकाल
कोणी दिवे लावत नाही रात्रींना,
आणि फुलांची आरासही
होत नाही सणासुदीला सकाळी.

मीच फक्त बसून असतो
पायरीवर. गाणं गात. कित्येक तास.
आणि सारं सारं विसरल्यानंतर,
हाताच्या बोटावर शोधत रहातो......
विझलेल्या दिव्यांच्या प्रकाशांची
एखादी किरणशलाका.

- गजानन मुळे
like this page for more updates.....on facebook
कधीचा इथे मी.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

डोळ्यांमध्ये थेंब दवाचा

डोळ्यांमध्ये थेंब दवाचा नको साठवू सखी
त्या थेंबातच वसते दुःखी अश्रूंची पालखी

हसणे असले क्षणाक्षणांवर ; बेहोशीचा काळ
डोळ्यांमध्येच दडून बसते गळणारे आभाळ

आभाळातून येईल साजन, तुझ्या कुशीला ओल
अन् ओठांवर ठेवून जाईल हळवा कातर बोल

बोलायाचे असते तेंव्हा घर मौनानेच भरते
डोळ्यांमधले जुने पुराने आभाळच झरझरते

आभाळातील दवबिंदूंचा नको घेऊ अदमास
रात्री अपरात्रीला तुजला छळेल त्याचा भास

-    गजानन मुळे
-    २७.०२.२०१२.  

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

तारकांचा चंदेरी झगमगाट

तारकांचा चंदेरी झगमगाट
मोहवत असला कितीही
तरी सूर्य झाकोळता येत नाही त्यांना
हे सत्य कधीच बदलत नसतं.

आपलं आपण ठरवावं प्रत्येकानं
आकाशातल्या चांदण्या मोजत
बसून राहावं रात्रभर गच्चीवर .
कि तळपणारा सूर्य
डोक्यावर घेवून
दिवसभर चालत जावी
आपापली वाट ....

दिवस ओसरेपर्यंत....!
आयुष्य सरेपर्यंत....!!

- गजानन मुळे

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

पाण्यावर आले बगळे


पाण्यावर आले बगळे
जीव तळमळे
कुणा पारध्यासाठी
मी नाही मोजल्या
खूप विसरल्या
आठवणीतल्या गाठी

पाठीवरची  
चंद्र फुलांची
गोंदण वितळून गेली
काठावरती
आली भरती
सांज कुणी ही केली

नकोच आता
जाता जाता
हात पुन्हा तूं हलवू
दूर नभातील
अस्मानातील
लागली चांदणी लवू
  

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

खळ्ळ खट्याकखळ्ळ खट्याक
फोडा काचा
करा गर्जना
फुलवा वाचा

टायर जाळा
हरताळ पाळा
तोडा खुर्च्या
काढा मोर्चा

रेलरोको
रस्तारोको
इसको टोको
उसको टोको

लोकशाही
सारा बाही
कोणी नाही
कोणी नाही

निशाण उचला
इकडे चला
तिकडे चला
‘जय’ बोला

आम्ही शहाणे
ऐकू गाऱ्हाणे
दावू चने
खाऊ फुटाणे

कागद कलम
जालीम मलम ..!
माहिती मागवा
देश जागवा..!!

‘ गांधींचा देश ’
कोण म्हणाला ...?
खळ्ळ खट्याक
खळ्ळ खट्याक

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

ओल ....


पाराच्या दारावरती
चाफ्यांचा पाऊस पडतो
उंबरा ओलांडताना
पाय का माझा अडतो

सांजेचा सोहळा सरता
व्याकुळता कोठे विरते
घंटेच्या निनादाने
झरणे केवळ उरते

सोन्याची पाउले तुझी
या हिरवळ गवतावरून
फुलांच्या शय्येवरती
तू भाग्याचा हात धरून

संन्यस्थ  होऊन मी गं
वृत्तस्त वाजवीत वीणा
जळत्या वाटेवरच्या
घेत विखारी ताना

तू चाफ्याचा गंध
ढवळून हर्षे ही प्यावी
परि शुष्क धरित्रीमधली
तू ओल कधीतरी व्हावी
.

- गजानन मुळे
("....कधीचा इथे मी." मधून )


शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

उतरंड ....एके दिवशी
मी घरात माझ्या
उतरंडीवर
एकेक मडके
चढवीत होतो .

लहान काही
मोठे काही
बरेच होते ...

चुकले थोडे ...

रचता रचता
आकाराचे
अंदाज चुकले.
लहान - मोठे
कोणते कोठे ?
गणित हुकले .

... झाली गडबड ...

जे असावयाला
मुळात होते
मोठे भक्कम
ते वरती झाले .
आणि
इवले इवले
हलके नाजूक
खाली राहिले .

सरतेशेवटी
जे व्हायचे
तेच झाले
उतरंडीचे
सारे मजले
खाली आले.

... पण बिचारे
एक इवले मडके
चिरडून मेले .