मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

फक्त तुझी आठवण म्हणून ...!!


पहिल्या पावसानंतर
उठलेल्या मातीच्या वासात
पसरलेली हुरहूर ...
...मनात नकळत उतरणारी.
अंगणात उतरलेल्या
सांजेचा चेहरा मलूल... कोरडा...
किणाऱ्यावरच्या
अगणित पाऊलखुणात
हरवलेले तुझे पाय...
सूर्याच्या सात्विक डोळ्यात
वादळात उतरवीत तशी
..स्वप्नांची शिडं...
बेमालूम उतरलेली.
एखाद्या निर्मनुष्य पायवाटेवर
वाटचूकल्या वाटसरूसारखे
घुटमळणारे आयुष्या...
त्यात एखादी सांज
दुखऱ्या जखमांचं गोंदण लेऊन
तुझा चेहरा देऊन जाणारी...
....बिनदिक्कत.


मी उद्ध्वस्त वादळाचे
उरले-सुरले अवशेष....
माझ्या वटीत भरून ठेवतो आहे...

फक्त तुझी आठवण म्हणून ...!!

-    गजानन मुळे

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

ऋण

सांगून कधी का फिटते 
शब्दांचे ऋण आभाळी 
परतून पाखरे येती 
सांजेच्या मलूल वेळी

मी टाळत गेलो रस्ते 
ते उजाडणारे अंतर 
कुठेच पोचलो नाही 
हे कळून आले नंतर 

हातात निखारे फुलले 
हे ठेचाळताना पाय 
फुंकून पिताना ताक
ओठांवर आली साय

सुनसान रात्रीच्या वेळी 
मी मिटले जेव्हा डोळे 
अनुसयेच्या मांडीवरची 
तेंव्हा हसली होती बाळे

या उमलत्या कळ्यांची फुले व्हावी .....
या उमलत्या कळ्यांची फुले व्हावी
पाकळ्यांना आभाळाची कळा यावी

कोणता ऋतू तसा येतो घराला
कोण का खुडते कधी पाखराला

पापणीतल्या पाण्याला नाव नाही
चोर हा तर चोर असतो साव नाही


तू तशी आभाळवेडी पांगताना
कोवळे हे स्वप्न माझे रंगताना

ही अशी हातात आली दोन बोटे
नकळता बोचले कित्येक काटे

तरी ना सुटलेच वेडे वेड तुझे
रक्तातुनी रक्ताची हाक गाजे

का बरे खुडतात लोक या कळ्यांना
वेद्नेचाच घाव का या पाकळ्यांना

तू तशी 'मुलगी' याची खंत नाही
तुझ्यातून भेटते मला रोज आई

पावले जर चालली तर दूर जावी
अन् चालण्याचीही कधी नशा यावी

या उमलत्या कळ्यांची फुले व्हावी
पाकळ्यांना आभाळाची कळा यावी

- गजानन मुळे

मंत्र

पायरीवर पहुडलेलं मलूल अंग
सर्वदूर पसरलेला काळोखा रंग
चिमण्यांची चिवचिव अधूनमधून
रात्र पसरत चाल्लेली घरावर
तरी थाप नाही दारावर कुणाचीच ....

आज
आज ....आभाळ चिरून
नृसिंहाच्या रुपात
अवतरायला हवा

एखादा कवडसा
माझ्या बंद दाराआत
घरात ....!!

सोबण्याची झापड उघडून
या काळोखानं माझ्याच घरात
कसं घर केलं कळलंसुद्धा नाही
आता मला प्रल्हादासारखं काहीतरी
पुटपुटायला हवं ....!!

- गजानन मुळे