शनिवार, ३१ मार्च, २०१२

सावलीचं झाड ........


सर्वत्र रणरणत्या सूर्याचे दिशाहीन किरण सतेज.
स्वतःचीच सावली पायाखाली चेंगरतानाचा
असाह्य नाविलाज .

डोळ्यांत जागा असलेला गाव
शाबूत अपूर्ण स्वप्नांसारखा.
देहापुरती जमीन अंथरायला उसनवार.
दारोदार स्वप्ने पेरत फिरणारे हात.
ओठांच्या आत ब्रम्हांड जिभेवर...
पण पाणी मात्र आटलेलं...कधीच.
लाळ आहे फक्त अनिवार्य पचनासाठी.
कंठातून जयघोषाचे नाद अंबराला भिडणारे.
समृद्ध उद्यासाठी आजचा देह
काळाला दान केलेला.

त्याच्या ललकाऱ्यांनी रोमांचाचे शेत अंगभर.
तो एक कफल्लक म्हातारा
सावली शोधत फिरतो आहे.....
.....रणरणत्या भर दुपारी.

तुमच्या मनात आहे ...
एखादं घर.....?
त्याला अंगण आहे ....?
अंगणात झाड आहे....?

सावलीचं ....?...!!

सोमवार, २६ मार्च, २०१२

ग्रेस ....


तुझे शब्द आभाळाच्या काजळखोलीतून
मंतरणाऱ्या श्वासाची वाट काढत
पुढे आले ...
आज आभाळ सुनं सुनं,
संध्येचा प्रहर सुना सुना,

माणसाच्या आदिम दुःखाला
कल्पनेच्या तीरावर,
संगीताचे मुलभूत पंख
आता कोण देईल...????

करुणातूर झाडांना
सळसळत्या पानांचे दान
कोण देईल....??

कोण म्हणेल आता प्रार्थना
जळणाऱ्या क्षितीजासाठी;
कोण आईच्या उदरात जावून
शोधील तिचं सुख – दुःख...??

कुणाला शक्य आहे आता
गाईच्या हंबराला शब्दात बांधनं...?

आता गहिवर उरतील शब्दांचे फक्त
आणि आकांत तुझी आठवण काढत
वाऱ्यावर झुलणाऱ्या रानात
संध्याकाळी बुडून जातील.

तू काळाला खुडून घेतलंस...
आणि आत्ममग्न झालास
आज कायमचा ...

आता तुझ्या शब्दांच्या वाटेने
अर्थांचा सोहळा शोधत
आम्ही किती संधिकाल
सजवत रहायचे मनात....?

- Gajanan Mule

शनिवार, २४ मार्च, २०१२

उसंत........




डोळ्यांवर झापड नाही.
रस्ता तसाच आहे पायांखाली.
या उन्हात दुपारी
फक्त रान तेवढे जळते आहे.

हात हातात आहेत खरे
पण रित्या ओंजळीत तू
कुठले मोती शोधतेयस....!!

वेडे ....
ही ओंजळ आहे फक्त
फुटक्या हातांची.
किनाऱ्यावर सापडलेला
शिंपला नाही.

मी रोज रात्री
हातावर फिरवता यावा चंद्र
कधी अर्धा कधी पुरा म्हणून
दिवस सारा सुर्याखाली विझत असतो.

ते तळव्यावर
कवडसे गोळा करायचे दिवस
हरवून गेले लहानपणी.
शोधले तर सापडतील
पण
आता उसंत कुठली.....!!

सोमवार, १२ मार्च, २०१२

रुतल्या जेंव्हा उरात काचा


रुतल्या जेंव्हा उरात काचा
ढाचा सारा डळमळला
एक म्हातारा भिंतीवरला
अति दुःखाने कळवळला

रक्त सांडले फरशीवरती
लालेलाल झाले घर
खिळखिळली कडीकिल्चने
ओझ्याने वाकले सर

निष्पर्णांची छाया दारी
मोर पिसारे गेले दूर
ओठावरल्या लाळेमधुनी
अन् शब्दांचे आले पूर 

डोळे वेडे ठाक कोरडे
शोधायला गेले अर्थ
म्हणालीच नजर कोरडी
‘ पुरे आता इतके तूर्त ’

मी आत्म्याचा सोडून खोपा
झेपा घेवून गेलो पार
वळलो तेव्हां कळले होते
बंदच झाले होते दार !!

१०.०३.२०१२.

नागवं भवितव्य

      
दिवस उजाडताना
प्रकाशात बुडून जाणाऱ्या
स्वप्नांच्या चांदण्या अगणित.
डोक्यावरचा सूर्य पेटताना
हातावरच्या पोटात
उसळणारा भुकेचा आगडोंब अगतिक.
ज्या खांबांखाली सारा दिवस जातो
त्याच्या तारेवर भरणारी
चिमण्यांची शाळा दुपारची.
पावसापाण्यात छप्पर शोधताना
बंगल्यांच्या कुलुपबंद गेटआतून
भुंकणारे विदेशी कुत्रे राजेशाही.
भोवती दाटून येणाऱ्या काळोखात
सरकारी काजव्यांचा आधार तात्पुरता.
संध्याकाळी थकून भागून
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपणारं
उद्याच्या उज्वल राष्ट्राचं भवितव्य नागवं.
  

मंगळवार, ६ मार्च, २०१२

साचा ....




मी मागे मागे जात राहिलो कुणाच्यातरी
तो मात्र माझ्यामागे कधी आलाच नाही

मी गर्दीतून वाट काढत पुढे...पुढे..पुढेच गेलो
यावेळीही तो गर्दीमध्ये दिसलाच नाही

मी मानेने होकार दिले, अनेकांचे सत्कार केले ...
पण त्याच्यावर परिणाम कुणाचा कसलाच नाही

मी झेंडे नाचवीत, गुलाल उधळीत बसलो
तो या वावटळीच्या गर्तेमध्ये फसलाच नाही

शेवटी मलाच त्याचा पाईक होणे भाग पडले
त्याने त्याचा आत्मा कुणाच्या साच्यात ओतलाच नाही 

-    गजानन मुळे 
like this page for more updates....

रविवार, ४ मार्च, २०१२

झाड




तू हुंकारांना ‘ हो ’ म्हणतेस
कातरवेळी हळवी होतेस ....

निरांजन तेवत ठेवतेस
रात्रंदिवस देव्हाऱ्यात,
कधी रात्री-अपरात्री आलीच जाग तर
तेल-वातीची खात्री करूनच
आभाळाला डोळे देतेस.


हसतेस अशी की...
संध्याकाळ दाटून येते मनात.
आणि रडतानाही
... स्फुंदण्याच्या पलीकडे
... आक्रोशाच्या अलीकडे ....
कुठेतरी उभी असतेस तू .

तुझे डोळे तेंव्हा
निरांजनातल्या तेलाने
डबडबलेले असतात....
आणि खरं सांगू ....
त्यावेळी मला ना
कापरासारखं जळायला होतं.

तू पाजळतेस् पलिते
आंबेचे ... तुळजाईचे ...
आणि अंगणात
धूळ उडू नये म्हणून ...
सडा-सरवण करतेस
रोजची रोज .

तू सांभाळतेस घर ....
की घरच सांभाळतं तुला....
हा असला संभ्रम आताशा
मला छळत नाही कधीच.

कारण मला कळू लागलंय हळूहळू ....
तू झाड आहेस ...
काट्याकुट्यांचं.....सावलीचं....
बाहुलीचं ..... माऊलीचं ...
पानांचं.....कळ्यांचं .....
फुलांचं....फळांचं ....

आणि एकूणच
धीरोदात्त मातीत
खोलवर रुजलेल्या
पक्क्या मुळांचं .

तू झाड आहेस ....
तू झाड आहेस .....!!