बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

एक मुलगी


एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते

जन्म काय ? मरण काय ? माहित नाही
कसले जगणे ..कसले वागणे ..विचारत राही

कोवळ्या नाजूक फुलापरी ती उधळी रंग
जगाच्या या रासामध्ये होते दंग

दु:खाला ती हसून टपली देते छान
खेदालाही मानत असते मान सन्मान

दिशांना ती करते आपल्या पायी चाळ
प्रिय तिलाही असेल साचा उघडा माळ

थक्क तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने चार
तिला कधी ना या जिण्याचा झाला भार

वादळांसमोर छाती करून उभी असेल
पाहिल त्याला दिसेल ती नभी असेल

तरीही ती हळवी असेल खूप खूप
अश्रुंचेही कधी पीत असेल खारट सूप

मनी तिच्या राजस कोणी रावा असेल
इथून खूप दूर दूरच्या गावा असेल

आभाळाला पसरून बाहू म्हणते यार
काळ्याकुट्ट शाईसाठी ती ' गुलजार '

निघतानाही तिच्याचसाठी अडतो पाय
तिचे माझे नाते म्हणजे सकळलेली साय

गुणगुणताना गाणी तिची येते सय
अन् तिच्या दुरावण्याचे वाटते भय


                          - गजानन मुळे
                           mulegajanan57@gmail.com

आई

आई
ती गेल्यानंतर मजला
 'कोणी नाही'  कळले
आयुष्य माझे सारे
समिधा होऊन जळले

जळली स्वप्नफुलेही
अक्रोशीत नेत्र वितळले
मज पदोपदी वाटेवर
श्वासाने निर्दय छळले

घडली पुढ्यात पापे
रक्त न कधी उसळले
मिसळले कशामध्ये ते ..
कुणीकडे ते वळले ...?

या शब्दांना मी माझ्या
जगतावर उगा उधळले
कधी उष्टावल्यावरी मी
कवितेने मला विसळले

'ती नाही ' म्हणूनी माझे
प्रारब्धच अवघे मळले
मी फिरता माझ्यामधुनी
अस्तित्त्व तिचे आढळले

सये सांज होते अशी रोज आता


सये सांज होते अशी रोज आता
उघडून पिसारे घानांचे आकाशी
ओठातले आर्त विझूनी विसावे
अंधारभरल्या मनाच्या तळाशी

सये सांज होते अशी रोज आता
येते येते तुझी हाक दुरुनी
स्वप्नील दु:ख माझे न्हाऊन येते
गडे चांदण्याच्या डोहात बुडूनी

सये सांज होते अशी रोज आता
कुणी गं कुणाचा घ्यावा घ्यावा गं ध्यास
विचारतो मी अजून अर्थ सारे
कधी घावलेल्या दूरच्या नभास

सये सांज होते अशी रोज आता
तुझे स्पर्श गात्रांत अंधारती
भल्या पहाटेची उन्हे कोवळी
कवितेची शाल कशी पांघरती

सये सांज होते अशी रोज आता
माझ्या चिरेबंदी वाड्यास तडे सारखे
रक्तात भिनुनी कुणी सांजपाखरू
क्षणात साजणी कसे होई पारखे

सये सांज होते अशी रोज आता
तुझी पावले पुन्हा वाळूवरी
आकाश वितळवून गाढ झोपलेल्या
विरक्त शांत ..निर्माल्य चंद्रापरी

सये सांज होते अशी रोज आता
जसे मंत्रभारल्या वाऱ्यात गाणे
दूर सागरी तिथे बुडे सूर्य आणि
इथे किनाऱ्यावरी मी उभे राहणे

सये सांज होता अशी रोज आता
तुझी आसवे मग ढळतात कुठूनी
बर्फात निजले माझे नेणीव पक्षी
अकस्मात सई गं येतील उठुनी

सये सांज होता अशी रोज आता
तू घेऊन येतेस गं ऋतू कोणता
माझे भोवताल सारे झंकारते
जाणता - अजाणता तू सांजावता

सये सांज होते अशी रोज आता
सये सांज होते अशी रोज आता

                       - गजानन मुळे
                          mulegajanan57@gmail.com

शाळा

शाळा

तो पहिला पाऊस ... ती रंगीत छत्री
भरलेलं दप्तर ... आदल्याच रात्री
हातात धरलेलं दादाचं बोट
फुलपाखरांनी भरलेलं आपलं पोट
बाईंनी घेतलेला मुका दिलेली कळी
जिभेवर विरघळलेली पेपर्मेंटची गोळी
गच्च मुठीत धरलेलं ते रूपयाचं नाणं
नव्या नव्या वहीची ती नवीकोरी पानं
नव्याकोऱ्या पुस्तकांचा घेतलेला वास
चालू वर्गातच सोडलेला उपवास
नवे नवे कपडे नवे नवे श्यूज
नव्या पुस्तकातलं नवंच गुज
नव्या ड्रेसवर पडलेला शाईचा डाग
नव्या नव्या मित्राचा आलेला राग
ती मधली सुट्टी तो गोपाळकाला
ते सोडावाटर ते बरफका गोला
काढलेला चिमटा केलेल्या चुका
आठवीच्या अभंगातून भेटलेला तुका
लागलेली छडी ... उठलेला वळ
अक्षरांतून मिळालेलं जगण्याचं बळ
ते सहा दुणे बारा ते बार दुनी चोवीस
ते पिंपळाचं पान ते मोराचं पीस
ती वाजणारी घंटा ... भरणारी शाळा
स्वप्नात येणारा वर्गातला फळा
ती ठोकलेली धूम ते उडालेलं पाणी
रेंगाळत राहिलेली पुस्तकातली गाणी


आता सुटलेली शाळा , फुटलेली पाटी
उरलेलं दप्तर ...... विरलेली दाटी

-    गजानन मुळे