सोमवार, २३ एप्रिल, २०१२

पाचू पेरल्या रानातून .....


पाचू पेरल्या रानातून कधी केला नाही प्रवास...
आकाशाच्या पांघरुणात कधी निजलो नाही निवांत.
स्वप्नांच्या लुकलुक चांदण्या मात्र
सदैव दाटून राहिल्या पापण्यात.
पायतळीची वाट विस्कटून गेली कित्येकदा....
पायांसकट उन्मळून पडलोही कधी ...
पण मूळं होती पक्की लोचट म्हणून वाचलो.
जमिनीशी लगट करून
त्यांनीच तर उभं केलं पुन्हा जमिनीवर.

आता फुटते आहे पालवी हळूहळू....
आणि आभाळही भरून येतं अधूनमधून....
स्वप्नांच्या चांदण्या मात्र ढळत नाहीत कधीच
टप्पोर गार गार थेंबांसोबत मुसळधार पावसातही....

म्हणूनच मी कदाचित जगत असेन ...!
किंवा ...
जिवंत असेन...!!  

-    गजानन मुळे

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

खेडे ...


खेडे .....
उघड्या रानात ...
निपचित निजलेले.
..भर दुपारी.
कुणीच नाही दिसत
शिवारभर.

घर न् घर
छपराखाली
सावली पीत...
स्वप्न सजवित....
...आठवणीत भिजताना
मधेच दचकते.

मनात त्याच्या
मारुतीच्या पारामागची
भिंत खचते...?

घडले काही,
असले नाही,
तरी परंतू ...

चुकचुकते पाल कधीची
भिंतीवरची...सरपटताना...
किडे ...मुंग्या चाटताना.

माहित नाही
पुढले काही
...भर दिवसा
ध्या दुपारी
सूर्य पहावा ...
अन् डोळ्यांवर
गच्च अंधारी.

तसेच काही
रणरणणारे
...उन्ह्च असते !
...काही नसते !

...उन्ह्च असते !!
...काही नसते !!
  

तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे


तुझ्या सावलीला उन्हाचे किनारे
तुझ्या पावलांना दिशांचे पहारे

माझ्या उशाला हात स्वतःचे
तुझ्या उशाला स्वप्न उद्याचे

आभाळ दाटे अवचित कधीही
कुणाची तमा कुणालाच नाही

कशा सांजवेळी उठतात ज्वाला
अन् पायाशी उडे..पडे झाडपाला

निखाऱ्यात ठिणगी निपचित निजली
हळूहळू  तीही नकळताच विझली

आता आठवांचे कढ फक्त उरी
रित्या रिकाम्या या माझ्याच दारी

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

कावळे




स्मरणांच्या वेशीवरती
दुःखाच्या वेली चढल्या
शब्दांच्या मिणमिण पणत्या
अंधारतळ्यात बुडल्या

गात्रांचे पेटव फुल
ही भूल विसर मंत्रांची
घे पांघरून रात्रीला
आईची जुनाट कुंची

डोळ्यातील थेंब दिवाने
हसतील कधीही बाई
आरशाच्या पाऱ्याला गं
भयं चेहऱ्यांचे उरले नाही

मी झोपत नाही आता
उगीच मिटतो डोळे
धमन्यांतील राक्तातूनही
उडतात किती कावळे.