बुधवार, २८ डिसेंबर, २०११

आंदोलन

हे आडखळनं ...पडणं..
तुटक तुटक बोलणं ...
श्वासांना मोजत मोजत
उपवास कारणं ...
खरंच पुरे आता ..!!

इथे...इथे...या इथे...
अन् तिकडे ....त्या तिथेही...
काळोखच काळोख नुस्ता
फक्त काजव्यांचे दिवे त्यात
पुरे आता ...!!

पेटवावा सूर्यच
अवघा माशालींचा ...
पणती ...दिव्यांचा नाच
आणि
रोजचे कॅन्डल मार्च
पुरे आता....!!

किती  शपथा ...

किती वृत्ते ...
किती आश्वासने ....
साऱ्या आणाभाका ...
..पुरे आता ...!!


मस्तवाल झालेत हत्ती
साखळदंड नाहीत कुणाला .
आसमंतात धुरांचे लोट नुस्ते
पुरे आता..!!

" हा टापांचा आवाज कुठला ...?
....ही धूळ कुठली ...?
...हा गाजेचा नाद कुठला ...?
..ही चमक ...ही धमक ...

....हे वाऱ्यावर तरंगणारे
उध्वस्त काळीज कुठले ....? "
हे शब्दांचे वादळ नुस्ते
पुरे आता  ..!!

" हा जयद्रथ हा सूर्य "
इशाऱ्याचे बोट आपलेच
तुताऱ्यांचे ओठ आपलेच
सारथी आहेत अज्ञात कोणी
परंतू संग्राम आपला...
...लढाई आपली
...शस्त्र आपणच
...अस्त्र आपणच

बस्स....
रथावरचा देव होणे ..
...पुरे आता ...!!
....पुरे आता...!!


- गजानन मुळे
२६.१२.२०११.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

काय कारण ....?

तसं सहजच होतं जगणं
फुलांसारखं ...मुलांसारखं
भिरभिर पाखरांसारखं

माड उंच जात होते ..
पतंग गोते खात होते ...
अधून मधून पाऊस होता ....उन्ह होतं
शेवटपर्यंत सोबतीला मन होतं

सोनेरी क्षण
ओंजळीतून
घरंगळन्याआधीची ही गोष्ट .

आता कुठे
नुसतं ' खुट्ट' झालं तरी
भीती वाटते .. विनाकारण

काय कारण ....?


- गजानन मुळे

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

रडू नकोस....

रडू नकोस इतक्यात
अजून खूप चालायचंय तुला

आभाळ तोलून धर तळहातांवर
गारठा थोपवून ठेव
त्वचेच्या सछिद्र दारातच .
पायात बळ शाबूत ठेव
हे आत्ताचं वादळ ओसरेपर्यंत .

पण मरेपर्यंत असाच वागू नकोस
म्हणजे झालं .

कारण ...
विस्तवाची आगही होते ...
... आणि राखही .

...मित्रा ...
मला ठावूक आहे ...
तू धगधगतो आहेस .

- गजानन मुळे
३०.०१.२०१२.

शनिवार, १० डिसेंबर, २०११

दीपक

वैशाखघडीच्या वाटा
माझे पाऊल अनवाणी
शांतीचा प्रहार होता
आकाश ढाळतो गाणी

हरवून शब्द माझा
निरखीत रान मी फिरतो
गार बनाची झाडी
वर पारवा उदास घीरतो

भविष्याच्या गर्भामधला
अंधार चाखतो मी ही
उडवीत धुळीचे लोट
अवकाश फिरवतो ग्वाही

संतप्त मनाचे भगवे
वेढून वस्त्र मी भवती
वाटांवर शोधत फिरतो
जगताची माझी नाती

पदराचा रेशीमकाठ
वाऱ्यावर भुरभूरताना
जपशील कसा तू दीपक
अंधार गर्द झरताना

- गजानन मुळे
("...कधीचा इथे मी."मधून )

बुधवार, ७ डिसेंबर, २०११

एखादी मैफिल.....

एखादी मैफिल संपते तेव्हां ..
कर्ण्याच्या कानात
उरलेल्या सुरांचा शोक होतो.

मैदानातल्या खुर्च्या .... गाद्या
रिकाम्या होताना
एक हुरहूर लागून राहते
अनामिक रित्या सुरांची .

मैफिल संपते तेव्हां
अबोल तंबोरा
विचारमग्न होतो
एखाद्या तपस्व्यासारखा .

रितं-रिकामं व्यासपीठ
कृतार्थ भावनेनं
व्याकुळ होतं
स्वतःला उखडून घेण्यासाठी .

आणि .....

गायकाच्या कंठात
नवं गाणं
आकाराला येऊ लागतं .

एखादी मैफिल संपते तेव्हां .....

- गजानन मुळे
०५.१२.२०११.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मागे एकदा

मागे एकदा वारा खूप वेड्यासारखा वागला
जेंव्हा तिची नि माझी पहिलीच भेट व्हायची होती .

दूरच्या टेकडीवर
ती एकट्याने भेटायला आलेली
.. दरी न्याहाळत
काठावर उभी राहिलेली
तितक्यात कुठल्या पिसाट ओढीनं
हा वारा
दरी चढून वर आला

तिच्या पदराशी खेळला ....
शरीराशी बिलगला ...

मी संतापलो ... चिडलो ...
त्याला माझ्यापेक्षा
जास्त ओढ होती तिची म्हणून .
नंतर ...
माझ्या बेताल बडबडीने
वारा हीरमुसला... रुसला ...

" ती " ची ओढ देऊन
शहाण्यासारखा निघून गेला

पण आता
मी फिरतो आहे दिशा दिशात
ती ची जीवघेणी ओढ घेऊन
त्या पिसाटल्या वाऱ्यासारखा
हा इतिहास आठवत मागला

खरंच ...
मागे एकदा वारा खुपच वेड्यासारखा वागला.

- गजानन मुळे
( "...कधीचा इथे मी." मधून )