शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

डोंगरांच्या पैल ...

डोंगरांच्या पैल गेल्या
दूर वाटा
तळ्यावरी तरंगांच्या
धुंद लाटा

सांज सरली ' ती ' तरीही
नाही आली
उदास ही व्याकुळवेळा
धुंद झाली

सांग तू आता सखींना
' मी ' नव्हते
किनाऱ्यावर बैसलेले
गाव होते

- गजानन मुळे

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

एक्सक्युज मी

माझ्याच प्राक्तनांचे अफाट ओझे
मलाच झेपेनासे झाल्यावर ...
जीव निघून जाईल डोळ्यांतून
शरीर सोडून .

" मी गेलो " याचं दुःख
असणार नाही मला ...

पण माझ्या प्रेताचे वारसदार
जमतील माझ्या सभोवती
आणि करतील आक्रोश
आंधळेपणाने
तेंव्हा ...

माझ्या संथ वाहिल्या जीवनाचा
हा निकृष्ठ शेवट
पाहवणार नाही माझ्याने .

मी दान करीत गेलो आयुष्यभर
माझी बेवारस आसवे
वाटेत भेटेल त्या नदीला

आता मात्र जाताना
ते रडतील धाय मोकलून....
तेंव्हा
त्यांची आसवे
बेवारस झाल्याचं दुःख
जाणवत राहील मला
...प्रेत झाल्यावरही ....

... पण एक्सक्युज मी ..

मी अजून जिवंत आहे .

रविवार, ८ जानेवारी, २०१२

हे गोड धुक्यांचे ढग सारे फुटण्याआधी ....
अनोळखी आपण एकमेकांनाच वाटण्याआधी ...
प्लॉंटफॉर्मवरून ही ट्रेन सुटण्याआधी ...
संशयाचे मळभ मनात दाटण्याआधी ...
आगंतुक नवीन कोणी भेटण्याआधी ...
हळुहळूच पण ठिणगी ही पेटण्याआधी ...
पतंगाची दोर मधेच कधी तुटण्याआधी ...
फुले सारीच गंधित असतात हे पटण्याआधी ...

तू सहज म्हणून एकदा
विचारून तर बघ मला .......

"......ओळखलंस !..? "

- गजानन मुळे

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

दिवे मालवले सर्वांनी

दिवे मालवले सर्वांनी
आणि झोपल्या मशाली
ही रात्र आता अंधारी
येईल उतरुनी खाली

मी गोधडीत माझ्या

मिनमिणतो कधीचा
त्यात हा नाद केवढा
त्या वाहत्या नदीचा

- गजानन मुळे

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

सांज म्हणाली होती

सांज म्हणाली होती ....

हा सूर्य तुझाच...
हे पक्षी तुझेच ..
अन् पंखांवर उतरणारे
आभाळही तुझेच आहे .

टिप्पूर चांदणं
पडेलच थोड्या वेळात .

....सांज म्हणाली होती .

- गजानन मुळे
सांज म्हणाली होती ....

हा सूर्य तुझाच...
हे पक्षी तुझेच ..
अन् पंखांवर उतरणारे
आभाळही तुझेच आहे .

टिप्पूर चांदणं
पडेलच थोड्या वेळात .

....सांज म्हणाली होती .

- गजानन मुळे

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

गत्यंतर

आकाश फाटोस्तोवर
सहन झालं
किंवा ...
सहन केलं असेल आम्हीच .

पण आताशा
साहवत नाही
....कुठलीच गोष्ट
....अगदी साधी सुद्धा
म्हणजे त्या तशा गोष्टींचा
जाम वैताग आलाय...
...आमचा आम्हालाच .

ज्याला मक्ता दिला जीनगानीचा
त्यानेच पायपोस केल्यावर
दाद तरी कुठे मागावी
...फुटक्या हातांनी ?

म्हणून आता
बांगड्या भरलेलेच हात
उगारल्याशिवाय
गत्यंतर नाही .


- गजानन मुळे

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

जुने ते दिवस

उन्हाच्या महाली आज आठवांनी दरवळणारे जुने ते दिवस
अजुनी कधीही तिची याद येता तळमळणारे जुने ते दिवस

कधी सांजवेळी गुढ मौनात माझ्या साकळणारे जुने ते दिवस
अन् कधी दुर्बोध शब्दात माझ्या आभाळणारे जुने ते दिवस

जरा सारख्या त्या क्षणांच्या झुल्यावर हिंदोळणारे जुने ते दिवस
मला शोधताना गर्दीत माझ्या ..... झाकोळणारे जुने ते दिवस

जुन्या वहीची जुनी पाने चाळताना गंधाळणारे जुने ते दिवस
कुठे मनातील दिसताच ओळी रेंगाळणारे ....जुने ते दिवस

डोळ्यांची डोळ्यांना कळावीच भाषा तसे कळणारे जुने ते दिवस
डोळ्यांतून गळावित जशी सुख दुःखे तसे गळणारे जुने ते दिवस

*****************************************

- गजानन मुळे
१४.०७.२०११.