ती च्या कविता

माझ्या "...कधीचा इथे मी." या कवितासंग्रहातील ' ती ' च्या कविता या विभागातील कविता जवळपास सर्वांना खूपच आवडल्या त्या कविता इथे मी जशाच्या तशा लिहीत आहे . वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा .आणि हो तुम्हालाही आवडतीलच ... काय वाटलं ? जरूर कळवा.



शब्दांचे ओझे वाहणारा मी....
तुला सारखा आठवतो आहे .
पण तुझी सय यावी तशी ....
तू कधीच येत नाहीस .

@@@@@@@@@
खिन्न सावल्यांची जाळी 
दूर तुझे गाव ....घर 

सावल्यांच्या ओटीपोटी 
गुज एक अलवार 

...दाटलेली रहदारी 
तुझ्या माझ्या घरीदरी

...नेते लुटून निर्धास्त ....
मुकाट ओसरी ......!!
@@@@@@@@@@@@@@@@@
हे गोड धुक्यांचे ढग सारे फुटण्याआधी ....
अनोळखी आपण एकमेकांनाच वाटण्याआधी ...
प्लॉंटफॉर्मवरून ही ट्रेन सुटण्याआधी ...
संशयाचे मळभ मनात दाटण्याआधी ...
आगंतुक नवीन कोणी भेटण्याआधी ...
हळुहळूच पण ठिणगी ही पेटण्याआधी ...
पतंगाची दोर मधेच कधी तुटण्याआधी ...
फुले सारीच गंधित असतात हे पटण्याआधी ...

तू सहज म्हणून एकदा
विचारून तर बघ मला .......

"......ओळखलंस !..? "
 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 
माझी सही दिसली की
कविता संपली
असं समजत जा

नाही तर काय होतं
मला वाचण्याच्या नादात
तू तुला इतकी विसरतेस
की कुठल्या विरामचिन्हांची
तुला जाणीवच उरत नाही
... इतकी तू मला जानतेस.

पण तरीही कुठेतरी
एक कविता संपत असते
तिथे तू थांबावस
क्षणभर विरामासारखं

म्हणून तुला सांगावं वाटलं
की....
माझी सही दिसली की
कविता संपली
.... असं समजत जा .


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

आता ही संध्याकाळ विरून गेल्यावर
कातर काळोख होऊन परतेल अंगणात
मग सरलेल्या दिवसांची काढीत आठवण
.....शोधीत खुणा
.....निखळ हासत राहील पुन्हा पुन्हा

तू बाशिंग उतरवून ठेवल्यानंतर
तुझ्या कपाळावर पडलेली
आणखी एका आठीची भर....
ती हलकेच माझ्या ओंजळीत ठेवील
मग शून्यस्त नजरेने पाहील आकाश
...विरून जाणारे ढग
...पंख फुटलेली पाखरं
...स्वच्छ प्रकाश

मग लवलेल्या विजांची येऊन आठवण
तुला आठवतील काही पावसाळे
भिजत राहण्याच्या उनाड दिवसातले

मग रेनकोटातून                                       
नकळत आत आलेला
एक पावसाचा थेंब
विसावेल माझ्या वृद्ध तळहातांवर

मग मला हळूहळू जाणवू लागेल
तो पाऊस ... त्या दिवसातला
मग डोळ्यांसमोर चक्क उगवून येईल
                 .....तो रस्ता ....ते वळण ..
                 .....ती सायकल ...ती आठवण
                 .....ती गाणी ....ते मौन
                 ......ते दिवस ....ते वर्ष
आता मला सारं काही आठवू लागेल

              ...ही संध्याकाळ विरून गेल्यावर
                  कातरकाळोख भरून आल्यावर ...!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 
माझ्यानंतर ...
आता या वेळेनंतर ...
कदाचित माझ्याएवढं
कुणी तुझ्यावर प्रेम करेल की नाही
खरंच माहित नाही

कुणीच करणार नाही
असा दावाही मी करणार नाही
कारण ...
उद्या तुला असं कुणी भेटेलही
माझ्याइतकंच किंबहुना
माझ्यापेक्षा जास्त पटेलही
मग तो कुणी मित्र ..प्रियकर ...सोबती .. सखा
किंवा शेवटी तुझा नवरा

पण तरीही तो
जेव्हा जेंव्हा तुझ्या मनासारखं वागेल
मी जे मागावं असं वाटलं होतं...
ते मागेल ...

तेंव्हा तू
मला विसरली असशील तरी
माझा आठव
गार वाऱ्याच्या झुळकीसारखा
तुला हलकेच भेटून ..

...निघून जाईल ...

@@@@@@@@@@@@@@@@@@@

 
तुझ्या आश्वासक चेहऱ्यावरचा
लाघवी विश्वास ...
... भुरळ घालेल कुणालाही

तुझ्या  पाणीदार... काळ्याशार  डोळ्यांनी
नजरबंद होईल कुणीही

तुझं मन ... मानिनी
तुझा स्वर ... रागिणी

तुझ्या स्वसमर्थ चालण्याच्या डौलावर
भाळेल कुणीही ...
.. मी भाळलो ...
तर त्यात ...
माझा असा
दोष तो काय ..!!

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 
जेव्हा जेव्हा
तू भेटतेस ना
... अवचित ...
पण ठरल्यासारखी
तेव्हा खूप खूप बोलायचं असतं तुझ्याशी

परंतु ...
मानात येतं ..
असं .. तसं ...
तू रुसलीस ...
तर कसं ..?

आणि मी
एखाद् काठोकाठ भरल्या घानासारखा
सुमसानपणे निघून जातो

... तुझ्यावरून  ..!!


@@@@@@@@@@@@@@@@@@
 
शेवटी मी तुझाच आहे ...
तू काही बोल्लीस तरी
आणि काहीच नाही बोल्लीस तरीही ..

बरेच उन्ह पावसाळे पाहिल्यावर
आता खरेच कळू लागले आहे ...
काय चुकले नि काय बरोबर ते .
जरी तू यायला थोडा उशीर केलास
तरी मी शेवटी तुझाच आहे ..
तू काही बोल्लीस तरी
आणि काहीच नाही बोल्लीस तरीही.

स्वप्न तर तशी मी ही रंगवतो खूप खूप
पण विस्कटून ... विरून जातात तेंव्हा
एकटा एकटा होऊन खूप फिरतो
जे कधीच सापडू शकत नाही
असं काहीतरी शोधत
कदाचित ... ती पुन्हा स्वप्नेच असली तरीही
... दुसऱ्या स्वप्नात पहिले स्वप्न उरत नाही
हे एक बरं असतं.

चालताना इथल्या वाटांना
मी विचारले होते
इथून पूर्वी कुणी का गेले होते ?
.. त्या तिथल्या धुळीला
नि डोंगराच्या माळेलाही
कुठेच कुणी भेटले नाही तरी
शेवटी मी तुझाच आहे
तू काही बोल्लीस तरी
आणि काहीच नाही बोल्लीस तरीही.

आपण एकमेकांवर
रुसून .. रागावून बसल्यावर
त्या चमचम चांदण्यांनी
तुला मला समजावलं असेल
तेंव्हा ना कळत्या श्रद्धेला
मी धर्म मानलं असेल
... कितीदातरी .

शेवटी मी तुझाच आहे
सुरुवातीला नसलो तरी
तू काही बोल्लीस तरी
आणि काहीच नाही बोल्लीस तरीही.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!