एकदा ओलेत्या केसांनी
आली होतीस समोर
आणि विचारलं होतंस..
‘मी कशी दिसतेय ?’ म्हणून.
खरंतर कविताच आली होती
ओठांवर
अचानक ढग दाटून यावेत तशी
पण मी स्वतःवरून वाहत्या
वाऱ्यात
वाहून गेलो.
.. मुसळधार कोसळायचं होतं
...राहून गेलो.
अजूनही मी भरून येतो
अधूनमधून
कोसळतोही मुसळधार
पण ओलेत्या केसांची
तू नसतेस समोर विचारायला
‘मी कशी दिसतेय’ म्हणून.
हे असं अवेळी भरून येणं
विजा पोटात घेऊन भरकटणं
म्हणजे
निव्वळ सोंग वाटतंय हल्ली.
ज्याला कुठेच अर्थ नाही
काहीच.
अशा निरर्थ पावसात
भिजणार कोण
आणि रुजणार तरी कसे.
हल्ली पाऊस येऊन
उभा असतो खोलीबाहेर
बोलावतोही मला बाहेर.
कोसळतो मुसळधार
हाका मारतो.
मी मात्र
अर्थ उडून गेल्या
कवितेसारखा
बसून असतो खिडकीजवळ.
माझ्याजवळ काहीच नाही
त्याला देण्यासारखं.
साधी साद सुद्धा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!