शनिवार, १५ मार्च, २०१४

प्रिय लिंकन,

प्रिय लिंकन,
स. न. वि. वि.

खूप वर्षापुर्वीचं तुझं ते पत्र मिळालंय आम्हाला
वारंवार वाचून परायणंही केलीत आम्ही त्याची.
आम्ही घडताना आणि बिघडतानाही
त्यातली एकेक ओळ सरकत राहिली
डोळ्यांसमोरून आमच्या.

आज खूप दिवसांनंतर
एखाद्या गोड छोकरीचा किंवा छोकऱ्याचा
निष्पाप चेहरा पुढ्यात येतो तेंव्हा
तुझ्या त्या ऐतिहासिक पत्राचा
मायना..मजकूर...आशय..काव्य...
सारं तंतोतंत आठवत राहतो आम्ही पुन्हा पुन्हा.

गफलत कुठे झाली माहित नाही
पण तू
भलतीच अपेक्षा केलीस यार आमच्याकडून.

त्यात तुझा काही दोष नसेलही कदाचित
पण तुझ्यानंतर तितका आदर
कुणी राखलाच नाही आमचा लिंकन.
पाट्यावर पाट्या टाकण्याचेच आदेश
बजावत आले सारे.
विनंती काय असते हे विसरलोच आम्ही आताशा.

काय सांगू ...
आताशा परिपत्रकांच्या ढिगाऱ्यातून
मान वर काढून सरळ चालणं
जमेनासंच झालंय बहुदा.
तू म्हणालाच होतास शेवटी शेवटी
‘ मी बरंच काही सांगतोय म्हणून.’
आणि ते सारंच काही शक्य नाही
हे ही तुला माहित होतं.

तुझा छोकरा भलताच गोड असेलही
तसं प्रत्येकाचाच छोकरा गोड मानतो आम्ही.
पण प्रत्येकाचा गोडवा वेगळा असतो
हे मानायला कोणीच तय्यार नाही आज.
ज्याला त्याला पाची बोटं
समान हवीत.

आमच्या हातांनाही बोटं आहेत लिंकन
पण ती जादूची नाहीत ...
परींना असतात तशी.
हे तुला तर माहितच होतं.
पण वळवावं तसं
वळत नाही पाणी कुठलंच.
ज्याचा त्याचा प्रवाह वेगळा
... वळण वेगळं.
हे कळतंच नाही कुणाला.

रेघोट्यांनी कागद भराभरा काळे होतात
त्यात कित्येकांचे उखळ पांढरे होतात..
आताशा निम्मा अधिक वेळ आम्ही
चौकटीत गुण म्हणून
संख्यांची मांडणी करण्यात घालवतोय.

आता आम्हाला आमचे पाय आहेत
पण रस्ता नाही...
हात आहेत
पण हातात काहीच नाही...
असं झालंय सारं.
घाणीला जुंपल्यासारखे
आम्ही चालत जातो
ठरवून दिलेली वाट.

पण तरी
तू काळजी करू नकोस लिंकन
आम्ही पुस्तकांच्या आड लपून
शिकवत आहोत खरंखुरं जगणं..
जमेल तेवढं... जमेल तसं...

फक्त कधी कधी
“ सापडलो तर...!”
अशी भीती वाटते अधून मधून.

असो.
बाकी काही नाही
तुझं ते पत्र आम्ही
खुंटीला टांगलं नाही अजून
इतकंच कळवायचं होतं तुला.

कळावे
तुझाच
कुणी एक हेडमास्तर / शिक्षक

११.०३.२०१२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!