बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

माझ्यानंतर ...

माझ्यानंतर ...
आता या वेळेनंतर ...
कदाचित माझ्याएवढं
कुणी तुझ्यावर प्रेम करेल की नाही
खरंच माहित नाही

कुणीच करणार नाही
असा दावाही मी करणार नाही
कारण ...
उद्या तुला असं कुणी भेटेलही
माझ्याइतकंच किंबहुना
माझ्यापेक्षा जास्त पटेलही
मग तो कुणी मित्र ..प्रियकर ...सोबती .. सखा
किंवा शेवटी तुझा नवरा

पण तरीही तो
जेव्हा जेंव्हा तुझ्या मनासारखं वागेल
मी जे मागावं असं वाटलं होतं...
ते मागेल ...

तेंव्हा तू
मला विसरली असशील तरी
माझा आठव
गार वाऱ्याच्या झुळकीसारखा
तुला हलकेच भेटून ..

...निघून जाईल ...

- गजानन मुळे
("...कधीचा इथे मी " मधून )