मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

साइड प्लीज ...!!

तू मूळ आहेस या लोकशाहीचं...
तूच बनवू शकतोस सरकार,

आणि तूच त्याला
पायउतार व्हायलाही
भाग पडू शकतोस...
तूच कारणीभूत आहेस
तुझ्या गतीला..
प्रगतीला...
आणि अधोगतीलाही.
या समाजाची सुरुवात तू,
आणि शेवटही तूच आहेस.


हे असलं बरंच काही
मी ऐकलं होतं तुझ्याविषयी.
पण तुला पाहिलं तेंव्हा
मला जाणवलं नाही काहीच.
वाटलं की ...
मी मलाच पाहतोय...
...आरशात.

मी जे काही
ऐकलं होतं तुझ्याविषयी...
ते समाजातला एक असणाऱ्या
प्रत्येकाविषयी.


पण
तू तर
गर्दीत गुदमरून गेलेला
“कोणी एक” आहेस.
मला माफ कर
मी तुला अजिबात ओळखत नाही.


एक्सक्युज मी..
....साइड प्लीज ...!!


- गजानन मुळे

भरतीच्या लाटांनी

भरतीच्या लाटांनी
तुडुंबलेले तुझे डोळे.
मी असा
निःशब्द ...काठोकाठ.
दिवस ...रात्र ...वर्षे...
तशीच चाल्ली आहेत निघून.
वर्षानुवर्षांनीही मी तसाच
...निरुत्तर !

तू हे कुठल्या देशातून

उचलून आणलंस कोडं ?
आजीच्या उखाण्याला
निदान अंदाज तरी होते...
पण तुझ्या प्रश्नाला तर
उत्तरच नाही ....!!
उत्तरच नाही ....!!

- गजानन मुळे

माझ्याच किनाऱ्यावरअनिवार उन्हाचा ताप, जसा की शाप, अहिल्येला.
मी उगाच मिटतो डोळे, प्राण तळमळे, गुढ सांजेला.

हातात दिशांचे दान, तसे अपमान, उरलेले ओठी.
काहूर की हुरहूर असे ही, तरीही, उरात घनांची दाटी.

मी शब्द दिलेला, मुग्ध झालेला तुला, सांजेच्या वेळी.
नजरेत भग्न गोपुरे, मुकी वासरे, निष्पर्ण काही ओळी.

अनिवार उन्हाच्या झळा, तसा कळवळा, तुझा गं सखे.
माझ्याच किनाऱ्यावर, करू देत घर, तुझी साजिरी दुःखे.

- गजानन मुळे

शेवटच्या ओळीवर

शेवटच्या ओळीवर
अडावा श्वास
आणि हुंद्क्यांची गंगा
वाहू लागावी...
तशी उभी होतीस तू
त्या दिवशी माझ्या समोर.

तुझ्या डोळ्यात मला
दिसत नव्हता चंद्र
पहाटेच्या प्राजक्तासारखा.
तुझा निरागस चेहरा...
गुहेतल्या काळोखासारखा वाटत होता.

आभाळावर ओढावेत ओरखडे तसे
प्रहराचे पाखरू सरकत होते पुढे पुढे....

आणि तिथेच हरवले होते माझे श्वास थोडे ...!!

- Gajanan Mule

फुंकर

प्लीज मला फक्त
एकदाच माफ कर’
एवढं म्हणण्याइतकंही काही
ठेवू शकलो नाही मी स्वतःजवळ.

एकदाच तर येते ही वेळ आयुष्यात...

एकदाच तर वाटत असते ओढ अनामिक...
एकदाच तर उठत असतं हे काहूर...
आणि एकदाच तर दाटते ही हुरहूर...
एकदाच तर
वाटून घ्यायचं होतं आभाळ.
पण...
एकदाच तर ही गोष्ट टाळली...!

आणि अनेकदा
आठवत बसतो फक्त.

“ऐसा होता तो वैसा होता
वैसा होता तो ऐसा होता”

.............
............
कोऱ्या कोऱ्या कागदावर
निरर्थ अक्षरांची फुंकर
......भलतीच भयंकर !!

- गजानन मुळे

नाकारताही आला पाहिजे रस्ता

नाकारताही आला पाहिजे रस्ता
हमरस्त्याला मिळणारा.
मळवाटांवरून चालणाऱ्यांची
दखल घेतच नाही काळ,
त्यांची पाऊलचिन्हे
उमटतात ... मिटतात फक्त ...
रोजच्या रहदारीत
हरवुनही जातात
तितक्याच सहज.

नव्या वाटेची
नव्या दिशेतून
नव्याच पावलांनी
सुरुवात करायलाच हवी.
मग बघ ...
तुझ्या दमदार पावलांच्या
ठशांना पाहून
सांगेल कुणीही नंतर...
कित्येक दिवस की...
“तो...तो या इथूनच तर गेला होता
इथूनच निघाला होता...” म्हणून.

कुणी ना कुणी
टाकेलच ते पाहिलं पाऊल
मग ते तुझंच का नको ?

या पुढच्या प्रत्येक पावलांसाठी
माझ्या हार्दिक शुभेच्छा !!

- गजानन मुळे

फुलपाखरू

मी सुरवंटासारखा
माझ्याच भोवती
विणत बसलोय
माझेच श्वास.
तुम्ही मला
काही सांगण्याची
किंवा समजावण्याची
अजिबात गरज नाही.

मला माहित आहे...

की याच श्वासांचा
एक दिवस
कोश तयार होईल.
आणि त्यात एखाद्या दिवशी
मीच गुदमरून मरून जाईन....
असंच वाटतंय नां तुम्हाला

हरकत नाही मेलो तरी.....

पण मला
हा कोश विणायचाच आहे,
बघायचंयच एकदा
स्वतःत गुरफटून.
मी या इथून निघून जाताना
माझ्या अस्तित्त्वाची
ओळख सांगणारा
एखादा रेशीमधागा
ठेवून जायचाय
या जगात... तुमच्यासाठी.

आणि काय सांगावं
मी एखादवेळ गुदमरण्या ऐवजी
फुलपाखरूच झालो तर ....

मुक्त होईन
हाच कोश पोखरून.....
रंगीत पंख पसरून..... !!
काय सांगावं...!!

- गजानन मुळे