शुक्रवार, २९ जुलै, २०११

दिवसास माझे


दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
तरी प्राण माझा करतो खुलासे
तुझी स्तब्धता ही दाटून येते
होतात हे शब्द माझे खुलासे

किती काळची ही असे स्तब्धता
तू जाता उरते कशी व्यर्थता
कसे चांदण्याचे मिटतात डोळे
तू दिसतेस तेव्हा होई सार्थता

घेऊन फिरतो मी ओळी कुणाच्या
बरसतात रात्री वेड्या घनांच्या
हळूवार आणि हळू बोलतो मी
कशा या वेळा कातर मनाच्या

कवडसे उन्हाचे मला जाळतात
सावल्याही मला का टाळतात
हरवून जाईल आता शून्यताही
इशारे कुणाचे कसे पाळतात

आता सांज होईल तुझ्या आठवांची
कविता बनावी जसी आसवांची
लिहुनी मिटावी जशी चार पाने
तशी न्यूनता ही तुझ्या लोचनांची

मंगळवार, १९ जुलै, २०११

मैखाना

मैखाना

टोकदार होत चाललेल्या काळाचे बोथट विचार
प्रसव वेदनांनी विव्हळत.. जळत राहणारी
संम्भ्रमाच्या कुशीत निजलेली ही भयाण रात्र 
मेजावरच्या पेल्यात मिसळलेले
भविष्य - भूतकाळाचे असंख्य पंखछाटले पक्षी 
जखमांच्या किनार्याशी पहुडलेल्या 
                 ....काही हुल्लड साउल्या 
                 ....अल्लड  विचार 

आता आपणच आवरायला हवं

आपलं हे जग 
उद्याही चालायचं आहे मग 
पावलांना बांधून रस्ते 
...न दिसणाऱ्या दिशेचा दिशेने
                    ....संध्याकाळ होईपर्यंत 
या सुंदर थकल्या स्वप्नांची थैली 
                          काखोटीला मारून 
"हा रस्ता अटळ आहे
अटळ आहे घाण सारी " म्हणत 

पण आज... आत्ताची वेळ
फक्त माझ्यापुरतीच ...
                        ... थोडी सरलेली 
                           थोडी उरलेली 
नकोच घाई 
गाऊ देत अंगाई
जरा या उरातील वादळांसाठी 
मग्नातून उठू देत भग्नांचेही मिनार
सुटू देत ग्रहण उजेडाचे क्षणभर
                .....निघू नंतर 
बस्सं....!
हा शेवटचाच पेग 
स्वतःच्या शेवटासाठी 

बधीराच्या भुंग्यांच रव 
आजून सुरु व्हायचाय
पाहायचाय मला माझाच चेहरा
आर्काचा तवंग होऊन फेसाळलेला 
बुडबुडयांसम  उसळलेला 

गाव दूर ...दूर ...
स्वप्न चूर ...चूर..
अंधारपार थांबलेला
पहाटेचा गंधगार  स्वप्नील अरुण

डोळे येण्याआधी भरून 
ही मैफिल ...अनोळख्यांची 
ही सोबत ...नसणार्यांची
विझलेल्या या ओळी 
                          निजलेला मैखाना
                           थोडेसे श्वास
                           आणि न दिसणाऱ्या क्षितीज्यावरून


                           तिने दिलेल्या आर्त हाका
मित्रा.....!
आता मला निघायलाच  हवं...!

डोळे

 
डोळे


काजळल्या  डोळ्यात
मावेना आभाळ
ओथंबलेले

पापण्यांचे काठ
हलती अल्लद
चिंब ओले

बोलक्या डोळ्यांनी
सांगितले काही
गहन निळे

पापणीत साचलेले
साजन सयीचे
खोल तळे


कधीची डोळ्यात
भिजली थिजली
दूरची रानवाट


नजरभर बिथरे

तळ्याकाठची
झाडी दाट

पाहताना डोळे
उठे आकांत
कुठे अंतरात


दिवेलागाणीस
निनादती घंटा
नित मंदिरात

सांज


           सांज


                                                      दुपारच्या तळ्यावर
                पंखांच वावर
                किती दूरदूरवर होतो
                झाडीत कुठे
                कोकीळ सुरेल गातो

                झोपल्या साऊल्या
                मिटवून बाहुल्या
                गर्द झाडीच्या हरीखाली
                हाकीत किरण
                उठवाया सांज आली