शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

ती खूप दिवसांनी भेटली तेंव्हा


ती खूप दिवसांनी भेटली तेंव्हा
सांगत होती काहीबाही
अधीर होऊन
बोलत होती मनसोक्त.

मी मात्र डोळस असून
आंधळा झालो.
आणि चालत गेलो
तिचीच वाट....
चालता चालता
तिच्या ओठांतून ठिबकणाऱ्या
शब्दांच्या प्रवाहात
वाहूनच गेलो अचानक...  
आणि नंतर कसोशीनं
प्रवाहाच्या उलट दिशेनं....
पोहत पोहत तिथे पोचलो...
जिथे तिच्या काळजाच्या किनाऱ्यावर
नक्षी कोरत वाळूवर ...
कुणीतरी केलेलं घर.
आणि नंतर
मीही मग
जाऊन उभा राहिलो...
गुढगाभर पाण्यात
एखाद्या ध्यानस्थ बगल्यासारखा
सावजाची वाट बघत ...

... ती बोलतच होती ....
... ती बोलतच होती ..........!!

आणि अखेरपर्यंत
सावजासारखा मला तिचा
एकही शब्द सापडला नाही.....!!

- Gajanan Mule

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

गैरसमज


प्रस्थरांवर कोरून ठेवावेत
एकेका दिवसाचे अंक....
आणि नंतर
याच खडकाच्या ढिगाऱ्यावर बसून
आयुष्याचा हिशोब चुकता करावा.

विश्वासाने कुणाच्या खांद्यावर टाकावा हात
तर हात निखळतात हल्ली ...
शब्द टाकून पहावा कोणाकडे तर
शब्दांचा खच पडतो आपल्याच पुढ्यात हल्ली....

त्यापेक्षा चिमण्यांशी ... झाडांशी ...
मावळत्या ....उगवत्या सूर्याशी बोललेलं बरं ....
समुद्रकिनाऱ्याची मऊशार वाळू तुडवत
संध्याकाळ घालवलेली बरी....

किंवा शेवटी उंबरठ्यावर बसून
समोरच्या चिंचोळ्या गल्लीतली गर्दी न्याहाळलेली बरी ....

हल्ली माणसांत मिसळलं की
भाऊगर्दीत सामील झाल्याचा 
माझा पक्का गैरसमज होतो.....!!

-    गजानन मुळे

सोमवार, ३० जुलै, २०१२

तू आज नाही आलास


तू आज नाही आलास
... उद्या येशील !!
उद्या नाही .....
तर परवा येशील ...!!

पण आज ना उद्या
तुला यावंच लागेल ...
हे तुलाही माहित आहे आणि मलाही.

पण असे किती दिवस आणि किती महिने
तू कोरड्याने तुडवत जाणार आहेस ...?
तुझ्या करड्या नी कोरड्या पावलांच्या
टाचेखाली काय काय तुडवत चाल्लायस...
हे एकदा ओल्या नजरेने पाहून तरी घे ...
ये ....

तू येशीलच कधीतरी ...
हे नक्की ...
पण वरातीमागून यावेत घोडे
तसा येऊन उपयोग काय ....?
तहानलेली माती आणि
तहानलेली गोठ्यात गाय ....!!

आभाळभर पाखरं आहेत ...
नभ आहे ... वारा आहे ...
सारं.....सारं... सारं आहे ....
फक्त नाहीस तो तू.

आणि तुझ्याशिवाय काहीच नाही
हे तुलाही माहित आणि मलाही


नक्षत्रांच्या कोरड्या दिठीशी


नक्षत्रांच्या कोरड्या दिठीशी
फुटकी ओंजळ .. तुटकी वेल
अन् राजाच्या खुर्चीपुढती
लिहिले कोणी सारे आलबेल

या खेपेला नाही आला
त्या खेपेला येईल म्हणून
ओसरीतल्या बाजेवारची
म्हातारी मेली कण्हून कण्हून

कोण सांगतो भविष्य इथले
कोणाच्या ओठी जयजयकार
तिथे रडवेला होतो तान्हा
इथे माजतो हाहाकार

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

पाऊस झरताना झाडीचा

पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

रानामधल्या धानावरून
पाणी गाणी गात ओघळताना
ताटांच्या पानांवरून ताटात
गुद्गल्या करत उतरताना
गार भरल्या रानावनात
आपला नाद घुमवीत जातो...
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

थरारत तू झाडाखाली
चिंब चिंब होत जातेस
नंतर तुला भान नसतं
चिखलातून चालत राहतेस
झरझर धार झरतानाही
तुझा असून तुझा नसतो
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....

शेन काढ ... चारा घाल
तुझी कामं चालूच असतात
गुरं मात्र गोठ्यामधली
अजिबात भिजत नसतात
माझं हसणं साहवत नाही
तुला आपला छेडीत जातो
पाऊस झरताना झाडीचा
सये पाऊस तुझा होतो....



- गजानन मुळे
www.facebook.com/kadhichaithemi

मधून

रविवार, २४ जून, २०१२

विठू तुझ्या भजनात

विठू तुझ्या भजनात
मळा नाही दंग आज
अभंगाच्या चालीवर
दुभंगला पखवाज

आभाळात नाही पाणी

ढेकळात उभा बाप
डोळियात निज नाही
ओठावर तुझा जप

कोरड्ल्या विहिरीत
कोरडला जीव
कीर्तनात - भजनात
भिजलेला देव

उरलेल्या पावसाला
आता विखाचाच विडा
तुझ्या मात्र अंगणात
अभंगांचा सडा

ओसाड गाव माझा
तिथे तल्लीन पंढरी
वारीत भिजायला
चालला वारकरी

पडला पाऊस
दूर डोंगराच्या देशी
इथे तुझ्या स्वागताला
सजलेल्या वेशी

नको होऊस आंधळा
रे गरीबाच्या देवा
पसाभर ओंजळीत
थोडे पाणी तरी ठेवा

- गजानन मुळे

शनिवार, २३ जून, २०१२

मी विसरून गेलोय

मी विसरून गेलोय
रिमझिम पावसाची
चार चार दिवसांची
अविरत झड.
मला आठवत नाही आता
कधी कधी संध्याकाळी
गप्पांच्या गाण्यामध्ये भिजणारा
पाराचा भलामोठा वड.
असा कितीसा काळ लोटलाय या अशा गोष्टींना
आत्ता आत्ताचीच तर आठवण आहे ही.

पण
काळासोबत प्रवाहाच्या दिशा बदलल्या
आणि वाऱ्याच्याही.
आता आठवण्याचा प्रयत्न करत
बसून राहावं गच्चीवर
इतकंच हाती उरलंय माझ्या.

कारण पाऊस पडू लागला की
आपणहून भिजायला जावं लागतंय.
...कुणास ठाऊक पुन्हा भेटेल की नाही.
तो भर रस्त्यात भेटण्याची...
आपसूक भिजण्याची मजा काही औरच.
आता जमवावा लागतो मेळा
वेळा वगैरे ठरवून.

तशी कुणालाच उसंत नाही
... पावसाला अन् माणसांनाही.

कुणास ठावूक
सगळे कुठे गुंतलेत...!!!


- गजानन मुळे
www.facebook.com/kadhichaithemi