रविवार, ४ मार्च, २०१२

पायांखालचा रस्ता




मी पुन्हा पुन्हा उचलतो पाय,
पुन्हा पुन्हा मांडून बघतो डाव.
काय सांगावं ... कधी ....कसा ....
पण कधीतरी नक्की रंगात येईल हा खेळ
......या आशेवरच
मी पुन्हा पुन्हा उचलतो पाय.

मी थकत नाही
चालून चालून ...
माझ्या ओठांवरले शब्द
संपत नाहीत अवेळी ...
भरत नाही कधीच
भरल्या ओंजळीतली पोकळी

मी अधूनमधून
माझे खिशे चाचपतो,
.... श्वास मोजतो,
..... नाडी तपासतो,
.... आभाळ बघतो.

आणि अशा पानगळीत
शिरीषाची पानं
झेलत बसतो अंगावर
एखाद्या संध्याकाळी,
मला माहित आहे ...
तो फुलणार आहे
थोड्याच दिवसात...
कुठल्यातरी वेळी.

“नको घाई,
घाई नको ...
मवाळ मजकुराला
रक्ताची शाई नको ”

मी बजावतो माझ्याच पायांना
अगदी पुन्हा पुन्हा ...

मी पुन्हा उचलतो पाय ....
हा पायांखालचा रस्ता
क्षितिजाच्या पार कुठेतरी संपतो
... असं मी ऐकलंय फक्त.
त्याच्या अंतापर्यंत चालत जावूनच  
मला संपूर्ण विश्रांती घ्यायचीय खरंतर....

पण खंत आहे ती इतकीच
की मी अद्याप क्षितिजही गाठू शकलो नाही
.

पावनखिंड




पालखीचा गोंडा हाले चढताना घाट
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

पोचेलच राजा आता एकदाचा घरी
डोळ्यांमध्ये आटलेली खोल खोल दरी
शेवटल्या मुजर्‍याची मान तरी ताठ
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

तलवारी भिडतील, खिंडारे पडतील
किती हात झडतील, कोण किती रडतील
किती काळ वाहील हा रक्ताचाच पाट
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

चुडा – काकनांचा आता फुटणार बांध
भाळी पुन्हा कुंकवाचा करपणार चांद
इवल्याशा यज्ञात ही आहुती अफाट
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

रण सारायला हवे, कुणी उरायला हवे
जुनीच ही ज्योत पण पलिते हे नवे
काळरात्रीचीं कधी या होईल पहाट
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

पालखीचा गोंडा हाले चढताना घाट
किती काट्याकुट्यांची अवघड ही वाट

-    गजानन मुळे

बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

किरणशलाका


माझ्या संभ्रम सलील मनात
उन्हाने आवर्तने केलीत.
दवाचे थेंब उडून गेलेत कुठे
काळोखाच्या पालख्यांतून.

आता संध्याकाळ वाटत नाही
ग्रेसच्या कवितेसारखी.
सारखी आठवण येत राहते
पाचोळल्या रानातून हिंडणाऱ्या पावलांची.

आता अनवाणी स्वप्नात
भविष्याची भूते
नाचत नाहीत कधीच.

आताशा पोकळ्यांचे प्रदेशच प्रदेश
विसाव्याला येतात
माझ्या भग्न मंदिराच्या
उद्विग्न गाभाऱ्यात.

जिथे आजकाल
कोणी दिवे लावत नाही रात्रींना,
आणि फुलांची आरासही
होत नाही सणासुदीला सकाळी.

मीच फक्त बसून असतो
पायरीवर. गाणं गात. कित्येक तास.
आणि सारं सारं विसरल्यानंतर,
हाताच्या बोटावर शोधत रहातो......
विझलेल्या दिव्यांच्या प्रकाशांची
एखादी किरणशलाका.

- गजानन मुळे
like this page for more updates.....on facebook
कधीचा इथे मी.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

डोळ्यांमध्ये थेंब दवाचा

डोळ्यांमध्ये थेंब दवाचा नको साठवू सखी
त्या थेंबातच वसते दुःखी अश्रूंची पालखी

हसणे असले क्षणाक्षणांवर ; बेहोशीचा काळ
डोळ्यांमध्येच दडून बसते गळणारे आभाळ

आभाळातून येईल साजन, तुझ्या कुशीला ओल
अन् ओठांवर ठेवून जाईल हळवा कातर बोल

बोलायाचे असते तेंव्हा घर मौनानेच भरते
डोळ्यांमधले जुने पुराने आभाळच झरझरते

आभाळातील दवबिंदूंचा नको घेऊ अदमास
रात्री अपरात्रीला तुजला छळेल त्याचा भास

-    गजानन मुळे
-    २७.०२.२०१२.  

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

तारकांचा चंदेरी झगमगाट

तारकांचा चंदेरी झगमगाट
मोहवत असला कितीही
तरी सूर्य झाकोळता येत नाही त्यांना
हे सत्य कधीच बदलत नसतं.

आपलं आपण ठरवावं प्रत्येकानं
आकाशातल्या चांदण्या मोजत
बसून राहावं रात्रभर गच्चीवर .
कि तळपणारा सूर्य
डोक्यावर घेवून
दिवसभर चालत जावी
आपापली वाट ....

दिवस ओसरेपर्यंत....!
आयुष्य सरेपर्यंत....!!

- गजानन मुळे

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

पाण्यावर आले बगळे


पाण्यावर आले बगळे
जीव तळमळे
कुणा पारध्यासाठी
मी नाही मोजल्या
खूप विसरल्या
आठवणीतल्या गाठी

पाठीवरची  
चंद्र फुलांची
गोंदण वितळून गेली
काठावरती
आली भरती
सांज कुणी ही केली

नकोच आता
जाता जाता
हात पुन्हा तूं हलवू
दूर नभातील
अस्मानातील
लागली चांदणी लवू
  

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

खळ्ळ खट्याक



खळ्ळ खट्याक
फोडा काचा
करा गर्जना
फुलवा वाचा

टायर जाळा
हरताळ पाळा
तोडा खुर्च्या
काढा मोर्चा

रेलरोको
रस्तारोको
इसको टोको
उसको टोको

लोकशाही
सारा बाही
कोणी नाही
कोणी नाही

निशाण उचला
इकडे चला
तिकडे चला
‘जय’ बोला

आम्ही शहाणे
ऐकू गाऱ्हाणे
दावू चने
खाऊ फुटाणे

कागद कलम
जालीम मलम ..!
माहिती मागवा
देश जागवा..!!

‘ गांधींचा देश ’
कोण म्हणाला ...?
खळ्ळ खट्याक
खळ्ळ खट्याक

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

ओल ....


पाराच्या दारावरती
चाफ्यांचा पाऊस पडतो
उंबरा ओलांडताना
पाय का माझा अडतो

सांजेचा सोहळा सरता
व्याकुळता कोठे विरते
घंटेच्या निनादाने
झरणे केवळ उरते

सोन्याची पाउले तुझी
या हिरवळ गवतावरून
फुलांच्या शय्येवरती
तू भाग्याचा हात धरून

संन्यस्थ  होऊन मी गं
वृत्तस्त वाजवीत वीणा
जळत्या वाटेवरच्या
घेत विखारी ताना

तू चाफ्याचा गंध
ढवळून हर्षे ही प्यावी
परि शुष्क धरित्रीमधली
तू ओल कधीतरी व्हावी
.

- गजानन मुळे
("....कधीचा इथे मी." मधून )