रविवार, १९ जानेवारी, २०१४

माणसांना माणसांशी जोडूया चला

पाखंड हे खंड खंड फोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

धर्म, पंथ, संप्रदाय हे निर्मिले कुणी
निर्मिकास जोखडात आवळले कुणी
देव आज देव्हाऱ्याबाहेर काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

मंत्र तंत्र यज्ञ याग बहुत माजले
नकळते ऋचा-श्लोक खूप पाजले
आपल्यातला देव आज शोधूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

गुदमरतो फुलांमध्ये देव आपुला
आपल्याच मुलांमध्ये शोधू देव आपुला
आंधळे ते नेत्र आज गाढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

अंध काही परंपरा या जाळूया चला
विकासाचा राष्ट्रधर्म पाळूया चला
अनाकलनीय हे दोर आज तोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

थोर इथे संत झाले ज्यांनी धर्म जाणला
मानवातील माणसालाच रे देव मानला
कल्पनेतील चित्र त्यांच्या काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला


३०.०८.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!