रविवार, १९ जानेवारी, २०१४

अन्न सुरक्षा

माय बाप सरकार...
तुमचा खलिता मिळाला.
वाचूनच भरून गेलं पोट.
तुम्ही आमच्या पोटाची काळजी केलीत
हे पाहून खरंतर आनंदच व्हायला हवं
पण तसं झालं मात्र नाही.

तुम्ही दोन किंवा तीन वेळच्या जेवणासाठी
आम्हाला अन्नाची हमी दिलीत.
तीही नाममात्र दरात.
पण आम्ही खरोखर इतके
विश्वासपात्र आहोत का ?
की अन्न मिळाल्यावर
उरलेल्या मजुरीचा
जगण्याच्या समृद्धीसाठी वापर करू.
तुम्ही कुठल्या मानसशास्त्रावर
पारखून घेतलंत आम्हाला
... आमच्या मनाला
तुम्ह्लाच ठावूक.

जर समजा
आम्ही एक दिवस काम करून
आठ दिवस बाकीचे
बसूनच खाऊ लागलो तर...
होईल विकास आमचा
किंवा तथाकथित देशाचा सुद्धा ?

आणि समजा  “ हे आयतखाऊ !”
म्हणून ओळखूच लागले लोक आम्हाला तर...
वाढेल आमचा मान तेवढाच समाजात ?
जेवढा सरकार दरबारी वाढला आहे आज.

आणखीन एक
आम्हाला या साऱ्या प्रकाराने
गिल्टी वाटू लागलं तर....
आम्ही ते सहन करूच म्हणा
त्या अन्नासाठी का होईना.
पण टाळत राहू कदाचित
या दारिद्र्य नावाच्या तुमच्या
काल्पनिक रेषेवर जाण्याचं.
त्यापेक्षा तुम्ही आमच्या या हातांना
योग्य ते काम दिलं असतं
आणि त्या कामाचा योग्य तो मोबदला.

तर आमच्या कार्यशक्तीचा
उपयोग नसता झाला ?
की आमचा आत्मसन्मान
असता ढळला ?
तुमच्याकडे कामच नाही काही द्यायला ?
की पैसेच नाहीत त्याची किंमत करायला ?

असो तुमच्या विचारधारेला
हे सगळं ‘ काल्पनिक किंवा मानसिक ’ वगैरे वाटतं
म्हणूनच आम्ही ही वास्तवाची वेस
ओलांडू शकलो नाही आजवर.

शेवटी एकूण काय तर आमच्यापेक्षा
तुमचाच फायदा जास्त दिसतोय यात.
होय ना माय बाप सरकार ?

-    गजानन मुळे
-    १७.१०.२०१३    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!