मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

तुझ्या येण्याने


तुझ्या येण्याने 

तुझ्या येण्याने...
ऋतू बदलणार नाहीत
...हे मलाही आहे माहित

पण पानगळीतही आतल्या आत
बहरत राहील झाड
तेव्हा गळणाऱ्या पानांचं पिवळं मन
त्याला विचारणार नाही प्रश्न
‘कसं रे सहायचं आता हे जग उष्ण”

तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं

काळ्याभोर कोकिळेसारखं
गात राहू उन्हात
कुठेतरी बनात
असेल निवारा
परक्याचाका होईना
राहू एखाद महिना
... पुन्हा नवा ऋतू ...

तुझ्या येण्याने ...
मीही भिजून जाईन पावसात
एकाकी वाटणार नाही
कितीतरी दिवसात

तुझ्या सोबतीनं
घडत जाईल सारं
नेहमीसारखं ...
पण एक पाखरू
...एक लेकरू
वाटणार नाही पारखं
... कुणालाही ..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!