बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

एक मुलगी


एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते

जन्म काय ? मरण काय ? माहित नाही
कसले जगणे ..कसले वागणे ..विचारत राही

कोवळ्या नाजूक फुलापरी ती उधळी रंग
जगाच्या या रासामध्ये होते दंग

दु:खाला ती हसून टपली देते छान
खेदालाही मानत असते मान सन्मान

दिशांना ती करते आपल्या पायी चाळ
प्रिय तिलाही असेल साचा उघडा माळ

थक्क तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने चार
तिला कधी ना या जिण्याचा झाला भार

वादळांसमोर छाती करून उभी असेल
पाहिल त्याला दिसेल ती नभी असेल

तरीही ती हळवी असेल खूप खूप
अश्रुंचेही कधी पीत असेल खारट सूप

मनी तिच्या राजस कोणी रावा असेल
इथून खूप दूर दूरच्या गावा असेल

आभाळाला पसरून बाहू म्हणते यार
काळ्याकुट्ट शाईसाठी ती ' गुलजार '

निघतानाही तिच्याचसाठी अडतो पाय
तिचे माझे नाते म्हणजे सकळलेली साय

गुणगुणताना गाणी तिची येते सय
अन् तिच्या दुरावण्याचे वाटते भय


                          - गजानन मुळे
                           mulegajanan57@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!