बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

शाळा

शाळा

तो पहिला पाऊस ... ती रंगीत छत्री
भरलेलं दप्तर ... आदल्याच रात्री
हातात धरलेलं दादाचं बोट
फुलपाखरांनी भरलेलं आपलं पोट
बाईंनी घेतलेला मुका दिलेली कळी
जिभेवर विरघळलेली पेपर्मेंटची गोळी
गच्च मुठीत धरलेलं ते रूपयाचं नाणं
नव्या नव्या वहीची ती नवीकोरी पानं
नव्याकोऱ्या पुस्तकांचा घेतलेला वास
चालू वर्गातच सोडलेला उपवास
नवे नवे कपडे नवे नवे श्यूज
नव्या पुस्तकातलं नवंच गुज
नव्या ड्रेसवर पडलेला शाईचा डाग
नव्या नव्या मित्राचा आलेला राग
ती मधली सुट्टी तो गोपाळकाला
ते सोडावाटर ते बरफका गोला
काढलेला चिमटा केलेल्या चुका
आठवीच्या अभंगातून भेटलेला तुका
लागलेली छडी ... उठलेला वळ
अक्षरांतून मिळालेलं जगण्याचं बळ
ते सहा दुणे बारा ते बार दुनी चोवीस
ते पिंपळाचं पान ते मोराचं पीस
ती वाजणारी घंटा ... भरणारी शाळा
स्वप्नात येणारा वर्गातला फळा
ती ठोकलेली धूम ते उडालेलं पाणी
रेंगाळत राहिलेली पुस्तकातली गाणी


आता सुटलेली शाळा , फुटलेली पाटी
उरलेलं दप्तर ...... विरलेली दाटी

-    गजानन मुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!