सये सांज होते अशी रोज आता
उघडून पिसारे घानांचे आकाशी
ओठातले आर्त विझूनी विसावे
अंधारभरल्या मनाच्या तळाशी
सये सांज होते अशी रोज आता
येते न येते तुझी हाक दुरुनी
स्वप्नील दु:ख माझे न्हाऊन येते
गडे चांदण्याच्या डोहात बुडूनी
सये सांज होते अशी रोज आता
कुणी गं कुणाचा घ्यावा घ्यावा गं ध्यास
विचारतो मी अजून अर्थ सारे
कधी घावलेल्या दूरच्या नभास
सये सांज होते अशी रोज आता
तुझे स्पर्श गात्रांत अंधारती
भल्या पहाटेची उन्हे कोवळी
कवितेची शाल कशी पांघरती
सये सांज होते अशी रोज आता
माझ्या चिरेबंदी वाड्यास तडे सारखे
रक्तात भिनुनी कुणी सांजपाखरू
क्षणात साजणी कसे होई पारखे
सये सांज होते अशी रोज आता
तुझी पावले पुन्हा वाळूवरी
आकाश वितळवून गाढ झोपलेल्या
विरक्त शांत ..निर्माल्य चंद्रापरी
सये सांज होते अशी रोज आता
जसे मंत्रभारल्या वाऱ्यात गाणे
दूर सागरी तिथे बुडे सूर्य आणि
इथे किनाऱ्यावरी मी उभे राहणे
सये सांज होता अशी रोज आता
तुझी आसवे मग ढळतात कुठूनी
बर्फात निजले माझे नेणीव पक्षी
अकस्मात सई गं येतील उठुनी
सये सांज होता अशी रोज आता
तू घेऊन येतेस गं ऋतू कोणता
माझे भोवताल सारे झंकारते
जाणता - अजाणता तू सांजावता
सये सांज होते अशी रोज आता
सये सांज होते अशी रोज आता
- गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!