रविवार, १९ जानेवारी, २०१४

घर करू दे पिल्लांना

घर करू दे पिल्लांना
तुझ्या घरट्यात बाई
कालच्या पावसात
त्यांची हरवली आई

नको ओळख पाळख
रक्त त्यांचे लाल
दैवरात निथळले
जसे पाकळ्यांचे दल

कोरड्या हाकेने
नको होऊस आंधळी
रात्रीला विचारेल
तुझे नाव गं गोंधळी


-    २९.०२.२०१२

अंगणात फुललेली

अंगणात फुललेली
महानंदीची जाळी
आभाळाला टाळी
नको देऊ

खांद्यावर ओझे
करपले हात
मुखामध्ये शीत
नको ठेऊ

वाटेवर धूळ
माखले पाऊल
कुणाची चाहूल
घेऊ नको

सांजच्या दाराला
पिकलेला जीव
त्यात आणि हिव
लेऊ नको.


२९.०२.२०१२ 

मला घराबाहेर पडायलाच हवं.

कुंपणाच्या तटबंदीत
घराचा बालेकिल्ला झालाय...
अंगणात पाणीही साचलंय खूप.

आता वाटा निसरड्या झाल्या असतील...
बाहेर पडेन तेंव्हा
पाऊल जपून टाकायला हवं.
चौकटीचा हा येवढा खंदक
पार झाला की झालं,  
... आलंच आपलं गाव.

किती दिवस... किती महिने
एव्हाना किती वर्षे उलटून गेली असतील....
मी घराबाहेर पडलो नाही.

असा आलो आत
आणि गुंतून पडलो घरातच
साधताच आला नाही मुहूर्त
या इथून निघण्याचा.
निमित्ते शोधत वाट पाहत राहिलो
वेळ येण्याची...

ती आलीच नाही
मात्र आता
उरल्या सुरल्या दिवसांची
मौज लुटायला
मला घराबाहेर पडायलाच हवं.


२१.०२.२०१२ 

माणसांना माणसांशी जोडूया चला

पाखंड हे खंड खंड फोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

धर्म, पंथ, संप्रदाय हे निर्मिले कुणी
निर्मिकास जोखडात आवळले कुणी
देव आज देव्हाऱ्याबाहेर काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

मंत्र तंत्र यज्ञ याग बहुत माजले
नकळते ऋचा-श्लोक खूप पाजले
आपल्यातला देव आज शोधूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

गुदमरतो फुलांमध्ये देव आपुला
आपल्याच मुलांमध्ये शोधू देव आपुला
आंधळे ते नेत्र आज गाढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

अंध काही परंपरा या जाळूया चला
विकासाचा राष्ट्रधर्म पाळूया चला
अनाकलनीय हे दोर आज तोडूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला

थोर इथे संत झाले ज्यांनी धर्म जाणला
मानवातील माणसालाच रे देव मानला
कल्पनेतील चित्र त्यांच्या काढूया चला
माणसांना माणसांशी जोडूया चला


३०.०८.२०१३

काहूर उठे शब्दांचे

काहूर उठे शब्दांचे
पाऊस तसा कोसळतो
दूर कुठे रानात
हिरवा कापूस जळतो

नसतात मनाला दारे...
सताड उघडी खिडकी
म्हणून कोनाड्यातून
मी रचून ठेवतो मडकी

पाऊस असा लयभारी
दुःखाला जागवणारा
गावाच्या वेशीवरती
आक्रंदन मागवणारा

-    गजानन मुळे

-    ११.०८.२०१३

आता रुपया पडला म्हणतात

आता रुपया पडला म्हणतात
म्हणून भाव वाढला म्हणतात
 
तुम्ही तुमचे पगार
वाढवून घेतलेत
स्वतःकडून.
आणि निवृत्तीवेतनातही
वाढ केलीत एकमताने.
पण बहुमताने ज्यांनी
तुम्हाला निवडून दिले
त्यांचे काय ?
 
त्यांना फक्त लाथा...
आणखी काय !
 
आम्हाला खरं तर निवृत्तीच नाही
मग वेतन कुठून मिळणार.
आम्ही रिटायर झालो तरी
स्वतःच्या सेवेत रुजू होणार.
 
तुमच्या तिजोरीत
खडखडाट आहे म्हणता
मग स्वतःचे वेतन भत्ते
काय कर्जे काढून घेता.
 
असं करा
एकदाचा गहाणच ठेवून द्या सारा देश
म्हणजे निदान तुम्ही बुडीत निघाल्यावरतरी
आम्हाला नव्या मालकांकडून
काही अपेक्षा ठेवता येतील.
 
आमचा संपूर्ण विश्वास आहे तुमच्यावर
एक ना एक दिवसतरी
तुम्ही हे नक्की कराल म्हणून
 
जय हिंद !!
 
      - गजानन मुळे
        २३.०८.२०१३

नको सोडूस बाई

नको सोडूस बाई
जीव भुकेला अजून
तुझ्या डोळियाचे पाणी
पुन्हा येईल रुजून
 नको होऊस आंधळी
अशी झाकुनिया राख
वीझतील पापण्यांतीलनिखारे गं लाख
 नको लपवूस तोंड
तुझा पाहू दे गं चेहरा
तुझ्या दुःखाचे आभाळ
कसे होई सैरावैरा घे हातामध्ये दिवा
त्याला काजळी चढलीकाढ खरवडून जखम
त्याला खपली चढली
 -    गजानन मुळे
-    २३.०८.२०१३

निर्मळ समाधान



आपल्या जवळच्याच कितीतरी गोष्टी
आपण शोधत फिरतो गावभर.
शेपटीमागे लागलेल्या मोत्यासारखे.
आपण धावतच असतो
सुख, समाधान आणि आनंद
याचं शेपूट शोधत.

पण होतं काय
की आपण शेवटपर्यंत ल्हाकतच रहातो...
थकत जातो...
खाली – वर, मागे – पुढे, इकडे – तिकडे..
कुठे कुठे शोधतो आपण ?

शेवटी बावळट वाटणाऱ्या मोत्यासारखे
आपणही थकून, भागून, पाय दुमडून...
बसतोच ना एकदाचे.
आणि मग सारं सुख, समाधान आणि आनंद
आपसूकच आपल्यासमोर येऊन उभे राहतात
अलगद मोत्याच्या शेपटीसारखे.

पण धावण्यात... शोधण्यात
मौज असते... हे नक्की.

बस्स !
आपण ठरवायला हवं...
आपल्याला काय हवं...
आपल्याच जवळचं शेपूट
की आणखीन दुसरं काही.

जे शोधताना... पकडताना...
होऊन जाईल पार दमछाक.
पण तरी आपण धावत... शोधत... रहावं.
त्या शेवटच्या निर्मळ... निखळ समाधानासाठी.

अविरत... अखंड... एकदातरी !
अविरत... अखंड... एकदातरी !

-    गजानन मुळे

       ०९/१०/२०१३