बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

शेत माझे


शेत माझे

सावल्यांची दाट जाळी हे शेत माझे
मेघ मनी पावसाळी हे शेत माझे

श्वेदबिंदूंचीआरती हे शेत माझे
मनभावनांची भरती हे शेत माझे

कुण्या अप्सरेची काया हे शेत माझे
मायमाऊलीची माया हे शेत माझे

अर्ताहुनी आर्त बोल हे शेत माझे
अभंगवाणीपरी खोल हे शेत माझे

न संपणारा लांब रस्ता हे शेत माझे
राबणाऱ्यांचा शिरस्ता हे शेत माझे

संजीवनी सरिता हे शेत माझे
रानकवीची कविता हे शेत माझे 

भुरभुरता पाऊस

भुरभुरता पाऊस


भुरभुरता पाऊस, भिजलेली वाट
हसणाऱ्या डोळ्यांचा ओलाच काठ

ओल्या ओठांचा ओलाच संदेह
ओल्या ओल्या मनाचा ओलाच देह

ओलं आभाळ... तशी ओली हवा
ओलसर मातीचा ... गंधही नवा

भुरभूरता पाऊस .. भिरभिरते केस
 भिरभिर शब्दांचा वेगळाच देश

अनोळख्या समुद्राची ओळखीची गाज
भलतंच काही सुचतंय ना आज

रुजलेला पाऊस ... भिजलेली ती
तिच्याच काठावर ... रुजलेला मी

          गजानन मुळे
       mulegajanan57@gmail.com

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

एक वेल्हाळ पाखरु


एक वेल्हाळ पाखरु
            नभ रेखाताना
झाले गर्भार क्षितीज
            ढग पेलताना

आला उगवून इंद्रधनू
            आकाशाच्या ओटीपोटी
या कडेची त्या कडेला
            कशी सुरेख वेलांटी

त्याचा रंगही गहिरा
            कसं शब्दात मावेना
संध्येच्या कातरवेळी
            कसे एकटे रहावेना

ये तू होऊन पाऊस
            भिजव या वाटा
जन्मभरीच्या दु:खाचा
काढ हलवून काटा

गजानन मुळे

तुझा


तुझा

निळ विस्तीर्ण आकाश
मोठं करतं मन
विसरतो आपण...
होत जातो त्याचे

हिरव्या पिवळ्या पानात
लपलेली फुले
सांगू लागतात कहाणी
एका अगम्य पर्वाची
... राम्यपणे

विस्कटलेला पट
आपसूक जुळतो
टळतो वाद आपोआपच

पुन्हा फिरू लागतात चक्र
सुरु होतात अगणित
लावण्यमयी रात्री
आणि हळूहळू
होत जातो मी
...त्या विस्तीर्ण आकाशाचा
... अवकाशाचा
... तुझा   !!!

दिवसास माझे

दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
तरी प्राण माझा करतो खुलासे
तुझी स्तब्धता ही दाटून येते
होतात हे शब्द माझे खुलासे

किती काळची ही असे स्तब्धता
तू जाता उरते कशी व्यर्थता
कसे चांदण्याचे मिटतात डोळे
तू दिसतेस तेव्हा होई सार्थता

घेऊन फिरतो मी ओळी कुणाच्या
बरसतात रात्री वेड्या घनांच्या
हळूवार आणि हळू बोलतो मी
कशा या वेळा कातर मनाच्या

कवडसे उन्हाचे मला जाळतात
सावल्याही मला का टाळतात
हरवून जाईल आता शून्यताही
इशारे कुणाचे कसे पाळतात

आता सांज होईल तुझ्या आठवांची
कविता बनावी जसी आसवांची
लिहुनी मिटावी जशी चार पाने
तशी न्यूनता ही तुझ्या लोचनांची




तुझ्या येण्याने


तुझ्या येण्याने 

तुझ्या येण्याने...
ऋतू बदलणार नाहीत
...हे मलाही आहे माहित

पण पानगळीतही आतल्या आत
बहरत राहील झाड
तेव्हा गळणाऱ्या पानांचं पिवळं मन
त्याला विचारणार नाही प्रश्न
‘कसं रे सहायचं आता हे जग उष्ण”

तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं

काळ्याभोर कोकिळेसारखं
गात राहू उन्हात
कुठेतरी बनात
असेल निवारा
परक्याचाका होईना
राहू एखाद महिना
... पुन्हा नवा ऋतू ...

तुझ्या येण्याने ...
मीही भिजून जाईन पावसात
एकाकी वाटणार नाही
कितीतरी दिवसात

तुझ्या सोबतीनं
घडत जाईल सारं
नेहमीसारखं ...
पण एक पाखरू
...एक लेकरू
वाटणार नाही पारखं
... कुणालाही ..!!