सोमवार, २६ मार्च, २०१२

ग्रेस ....


तुझे शब्द आभाळाच्या काजळखोलीतून
मंतरणाऱ्या श्वासाची वाट काढत
पुढे आले ...
आज आभाळ सुनं सुनं,
संध्येचा प्रहर सुना सुना,

माणसाच्या आदिम दुःखाला
कल्पनेच्या तीरावर,
संगीताचे मुलभूत पंख
आता कोण देईल...????

करुणातूर झाडांना
सळसळत्या पानांचे दान
कोण देईल....??

कोण म्हणेल आता प्रार्थना
जळणाऱ्या क्षितीजासाठी;
कोण आईच्या उदरात जावून
शोधील तिचं सुख – दुःख...??

कुणाला शक्य आहे आता
गाईच्या हंबराला शब्दात बांधनं...?

आता गहिवर उरतील शब्दांचे फक्त
आणि आकांत तुझी आठवण काढत
वाऱ्यावर झुलणाऱ्या रानात
संध्याकाळी बुडून जातील.

तू काळाला खुडून घेतलंस...
आणि आत्ममग्न झालास
आज कायमचा ...

आता तुझ्या शब्दांच्या वाटेने
अर्थांचा सोहळा शोधत
आम्ही किती संधिकाल
सजवत रहायचे मनात....?

- Gajanan Mule

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!