सोमवार, १२ मार्च, २०१२

रुतल्या जेंव्हा उरात काचा


रुतल्या जेंव्हा उरात काचा
ढाचा सारा डळमळला
एक म्हातारा भिंतीवरला
अति दुःखाने कळवळला

रक्त सांडले फरशीवरती
लालेलाल झाले घर
खिळखिळली कडीकिल्चने
ओझ्याने वाकले सर

निष्पर्णांची छाया दारी
मोर पिसारे गेले दूर
ओठावरल्या लाळेमधुनी
अन् शब्दांचे आले पूर 

डोळे वेडे ठाक कोरडे
शोधायला गेले अर्थ
म्हणालीच नजर कोरडी
‘ पुरे आता इतके तूर्त ’

मी आत्म्याचा सोडून खोपा
झेपा घेवून गेलो पार
वळलो तेव्हां कळले होते
बंदच झाले होते दार !!

१०.०३.२०१२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!