सोमवार, १२ मार्च, २०१२

नागवं भवितव्य

      
दिवस उजाडताना
प्रकाशात बुडून जाणाऱ्या
स्वप्नांच्या चांदण्या अगणित.
डोक्यावरचा सूर्य पेटताना
हातावरच्या पोटात
उसळणारा भुकेचा आगडोंब अगतिक.
ज्या खांबांखाली सारा दिवस जातो
त्याच्या तारेवर भरणारी
चिमण्यांची शाळा दुपारची.
पावसापाण्यात छप्पर शोधताना
बंगल्यांच्या कुलुपबंद गेटआतून
भुंकणारे विदेशी कुत्रे राजेशाही.
भोवती दाटून येणाऱ्या काळोखात
सरकारी काजव्यांचा आधार तात्पुरता.
संध्याकाळी थकून भागून
रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपणारं
उद्याच्या उज्वल राष्ट्राचं भवितव्य नागवं.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!