रविवार, ८ मे, २०१६

आमुक एक घटना घडल्यावर

आमुक एक घटना घडल्यावर
बातमीदारांनी तिला कवरेज दिलं भरपूर.
याने त्याला त्याने याला करत करत
शेवटी घरोघरी ही बातमी पोचलीच.
तेंव्हा वाईट वाटलंच साऱ्यांना
लोक हळहळले ...
आणि दिवसभर
ही बातमी चघळून
झोपी गेले निवांत.

पण रात्री ज्यांना झोपेत
स्वप्नं पडली भयानक
त्यांनी सकाळी उठून मोर्चे काढले
कँन्डल मार्च काढले...
रस्ते अडवले ...
वाढत वाढत वाढतच गेली
निषेध नोंदवणारी गर्दी.

आणि उभा देशच जागा झाला म्हटल्यावर
शेवटी नाविलाजाने का होईना
सरकारची झोपमोड होणं क्रमप्राप्त होतं.

आता ब्रेकिंग न्यूज येते आहे.....
" या सगळ्या प्रकरणाचा
छडा लावल्याशिवाय
सरकार आता शांत झोपणार नाही !"


- गजानन मुळे

एकांतात मनाला लाभले देऊळ

एकांतात मनाला लाभले देऊळ
गाभाऱ्यात घुमताना हळवीशी शिळ

पायरीशी कुणी का थांबले उगाच
कुणाच्या गं पायी आज रुतलेली काच

वेच गोवऱ्या दुपारी हलताना वारा
हलू दे थोडासा मध्यान्हीला पारा

पदराची गाठ सये सोडूच नकोस
कुणी सांगेल का कधी येईल पाऊस

एकदा ओलेत्या केसांनी

एकदा ओलेत्या केसांनी
आली होतीस समोर
आणि विचारलं होतंस..
‘मी कशी दिसतेय ?’ म्हणून.

खरंतर कविताच आली होती ओठांवर
अचानक ढग दाटून यावेत तशी
पण मी स्वतःवरून वाहत्या वाऱ्यात
वाहून गेलो.
.. मुसळधार कोसळायचं होतं
...राहून गेलो.

अजूनही मी भरून येतो
अधूनमधून
कोसळतोही मुसळधार
पण ओलेत्या केसांची
तू नसतेस समोर विचारायला
‘मी कशी दिसतेय’ म्हणून.

हे असं अवेळी भरून येणं
विजा पोटात घेऊन भरकटणं
म्हणजे
निव्वळ सोंग वाटतंय हल्ली.
ज्याला कुठेच अर्थ नाही
काहीच.

अशा निरर्थ पावसात
भिजणार कोण
आणि रुजणार तरी कसे.

हल्ली पाऊस येऊन
उभा असतो खोलीबाहेर
बोलावतोही मला बाहेर.
कोसळतो मुसळधार
हाका मारतो.

मी मात्र
अर्थ उडून गेल्या कवितेसारखा
बसून असतो खिडकीजवळ.
माझ्याजवळ काहीच नाही
त्याला देण्यासारखं.
साधी साद सुद्धा.

उन्हाळा



रानामध्ये किलबिलताना साळुंखीचा थवा
रिते रिते हात घेउनी जाऊ कुठल्या गावा

रानफुलांचे विझले दिवे, वाटेवरची धूळ उडे
विहिरीवर मी न्याहळत बसतो चिरा – तडे

पांढरपेशा रानामधला फड ऊसाचा पडला काल
आकाशातून रक्त ओकतो गोल सूर्याचा लालेलाल

गावामधला पार देवाचा दिसतो आता सुना सुना
भरून होती ओंजळ हिरवी, आता उरल्या फक्त खुणा

मी पायांना सांगून थकलो; नका थांबू उचला पाय
झळा वेढल्या गोठ्यामधली हंबरताना तांबी गाय 

खेडे

उन्हाच्या गर्द छायेत
खेडे निपचित निजलेले
भर दुपारी.

पायाखाली पोखरलेली भुई
वर आकाश वेडावलेलं
आता उघड्या रानात
खुरांची पायपीट नुसती
गवताची काडीही नाही
ना तरी
उरल्या सुरल्या रानाला

आग लागली असती.

शनिवार, १५ मार्च, २०१४

प्रिय लिंकन,

प्रिय लिंकन,
स. न. वि. वि.

खूप वर्षापुर्वीचं तुझं ते पत्र मिळालंय आम्हाला
वारंवार वाचून परायणंही केलीत आम्ही त्याची.
आम्ही घडताना आणि बिघडतानाही
त्यातली एकेक ओळ सरकत राहिली
डोळ्यांसमोरून आमच्या.

आज खूप दिवसांनंतर
एखाद्या गोड छोकरीचा किंवा छोकऱ्याचा
निष्पाप चेहरा पुढ्यात येतो तेंव्हा
तुझ्या त्या ऐतिहासिक पत्राचा
मायना..मजकूर...आशय..काव्य...
सारं तंतोतंत आठवत राहतो आम्ही पुन्हा पुन्हा.

गफलत कुठे झाली माहित नाही
पण तू
भलतीच अपेक्षा केलीस यार आमच्याकडून.

त्यात तुझा काही दोष नसेलही कदाचित
पण तुझ्यानंतर तितका आदर
कुणी राखलाच नाही आमचा लिंकन.
पाट्यावर पाट्या टाकण्याचेच आदेश
बजावत आले सारे.
विनंती काय असते हे विसरलोच आम्ही आताशा.

काय सांगू ...
आताशा परिपत्रकांच्या ढिगाऱ्यातून
मान वर काढून सरळ चालणं
जमेनासंच झालंय बहुदा.
तू म्हणालाच होतास शेवटी शेवटी
‘ मी बरंच काही सांगतोय म्हणून.’
आणि ते सारंच काही शक्य नाही
हे ही तुला माहित होतं.

तुझा छोकरा भलताच गोड असेलही
तसं प्रत्येकाचाच छोकरा गोड मानतो आम्ही.
पण प्रत्येकाचा गोडवा वेगळा असतो
हे मानायला कोणीच तय्यार नाही आज.
ज्याला त्याला पाची बोटं
समान हवीत.

आमच्या हातांनाही बोटं आहेत लिंकन
पण ती जादूची नाहीत ...
परींना असतात तशी.
हे तुला तर माहितच होतं.
पण वळवावं तसं
वळत नाही पाणी कुठलंच.
ज्याचा त्याचा प्रवाह वेगळा
... वळण वेगळं.
हे कळतंच नाही कुणाला.

रेघोट्यांनी कागद भराभरा काळे होतात
त्यात कित्येकांचे उखळ पांढरे होतात..
आताशा निम्मा अधिक वेळ आम्ही
चौकटीत गुण म्हणून
संख्यांची मांडणी करण्यात घालवतोय.

आता आम्हाला आमचे पाय आहेत
पण रस्ता नाही...
हात आहेत
पण हातात काहीच नाही...
असं झालंय सारं.
घाणीला जुंपल्यासारखे
आम्ही चालत जातो
ठरवून दिलेली वाट.

पण तरी
तू काळजी करू नकोस लिंकन
आम्ही पुस्तकांच्या आड लपून
शिकवत आहोत खरंखुरं जगणं..
जमेल तेवढं... जमेल तसं...

फक्त कधी कधी
“ सापडलो तर...!”
अशी भीती वाटते अधून मधून.

असो.
बाकी काही नाही
तुझं ते पत्र आम्ही
खुंटीला टांगलं नाही अजून
इतकंच कळवायचं होतं तुला.

कळावे
तुझाच
कुणी एक हेडमास्तर / शिक्षक

११.०३.२०१२.

गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

डोळ्यांना या .....

डोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.
आसवांना पाप
ण्यांशी थोपवावे लागते.

मी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी 
ही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी 

बोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा 
काय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा 

संपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी 
झोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.

- गजानन मुळे
२९/०१/२०१४

रविवार, १९ जानेवारी, २०१४

तू दिलेल्या आभाळावर

तू दिलेल्या आभाळावर
मी रोज सकाळी तिळा लावतो.
सांजेला चित्र रंगवतो.
आणि रात्री चांदण्या पेरतो.
 
पण कधीतरी
खूप राग आल्यावर
मला गाढ झोप लागल्यावर
त्यावेळी झोपेत
भयंकर स्वप्न पडल्यावर
मी दचकून जागा होतो.
आणि
तू दिलेलं आभाळ पाहतो.
 
तेव्हां
गाळात असतं आभाळ...
आणि माझा सूर्य, माझी चित्र...
माझ्या चांदण्या...माझा चंद्र...
वाहून गेलेलं असतं सगळं...!!
 
मला कळत नाही
रोज रात्री मी झोपल्यावर
का रडत असतं आभाळ !
 
तू निघून गेलीस तेंव्हापासून
हे असं चाललंय माझं
माझं नाही पण
या आभाळाचंच
वाढत चाललंय ओझं....
 
१८.०६.२०१२