शनिवार, १५ मार्च, २०१४

प्रिय लिंकन,

प्रिय लिंकन,
स. न. वि. वि.

खूप वर्षापुर्वीचं तुझं ते पत्र मिळालंय आम्हाला
वारंवार वाचून परायणंही केलीत आम्ही त्याची.
आम्ही घडताना आणि बिघडतानाही
त्यातली एकेक ओळ सरकत राहिली
डोळ्यांसमोरून आमच्या.

आज खूप दिवसांनंतर
एखाद्या गोड छोकरीचा किंवा छोकऱ्याचा
निष्पाप चेहरा पुढ्यात येतो तेंव्हा
तुझ्या त्या ऐतिहासिक पत्राचा
मायना..मजकूर...आशय..काव्य...
सारं तंतोतंत आठवत राहतो आम्ही पुन्हा पुन्हा.

गफलत कुठे झाली माहित नाही
पण तू
भलतीच अपेक्षा केलीस यार आमच्याकडून.

त्यात तुझा काही दोष नसेलही कदाचित
पण तुझ्यानंतर तितका आदर
कुणी राखलाच नाही आमचा लिंकन.
पाट्यावर पाट्या टाकण्याचेच आदेश
बजावत आले सारे.
विनंती काय असते हे विसरलोच आम्ही आताशा.

काय सांगू ...
आताशा परिपत्रकांच्या ढिगाऱ्यातून
मान वर काढून सरळ चालणं
जमेनासंच झालंय बहुदा.
तू म्हणालाच होतास शेवटी शेवटी
‘ मी बरंच काही सांगतोय म्हणून.’
आणि ते सारंच काही शक्य नाही
हे ही तुला माहित होतं.

तुझा छोकरा भलताच गोड असेलही
तसं प्रत्येकाचाच छोकरा गोड मानतो आम्ही.
पण प्रत्येकाचा गोडवा वेगळा असतो
हे मानायला कोणीच तय्यार नाही आज.
ज्याला त्याला पाची बोटं
समान हवीत.

आमच्या हातांनाही बोटं आहेत लिंकन
पण ती जादूची नाहीत ...
परींना असतात तशी.
हे तुला तर माहितच होतं.
पण वळवावं तसं
वळत नाही पाणी कुठलंच.
ज्याचा त्याचा प्रवाह वेगळा
... वळण वेगळं.
हे कळतंच नाही कुणाला.

रेघोट्यांनी कागद भराभरा काळे होतात
त्यात कित्येकांचे उखळ पांढरे होतात..
आताशा निम्मा अधिक वेळ आम्ही
चौकटीत गुण म्हणून
संख्यांची मांडणी करण्यात घालवतोय.

आता आम्हाला आमचे पाय आहेत
पण रस्ता नाही...
हात आहेत
पण हातात काहीच नाही...
असं झालंय सारं.
घाणीला जुंपल्यासारखे
आम्ही चालत जातो
ठरवून दिलेली वाट.

पण तरी
तू काळजी करू नकोस लिंकन
आम्ही पुस्तकांच्या आड लपून
शिकवत आहोत खरंखुरं जगणं..
जमेल तेवढं... जमेल तसं...

फक्त कधी कधी
“ सापडलो तर...!”
अशी भीती वाटते अधून मधून.

असो.
बाकी काही नाही
तुझं ते पत्र आम्ही
खुंटीला टांगलं नाही अजून
इतकंच कळवायचं होतं तुला.

कळावे
तुझाच
कुणी एक हेडमास्तर / शिक्षक

११.०३.२०१२.

गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

डोळ्यांना या .....

डोळ्यांना या पापण्यांना सोपवावे लागते.
आसवांना पाप
ण्यांशी थोपवावे लागते.

मी म्हणावे शब्द माझा हरवला आहे जरी 
ही कविता काळजाची प्राणाइतकी आहे खरी 

बोलायचे नसतानाही मी बोलतो आहे जसा 
काय वाट्टेल ते वाटो, मी आहे हा असा 

संपेल ही मैफिल जेंव्हा खंत ना राहो अशी 
झोपताना आसवांनी भिजवायची राहिली उशी.

- गजानन मुळे
२९/०१/२०१४

रविवार, १९ जानेवारी, २०१४

तू दिलेल्या आभाळावर

तू दिलेल्या आभाळावर
मी रोज सकाळी तिळा लावतो.
सांजेला चित्र रंगवतो.
आणि रात्री चांदण्या पेरतो.
 
पण कधीतरी
खूप राग आल्यावर
मला गाढ झोप लागल्यावर
त्यावेळी झोपेत
भयंकर स्वप्न पडल्यावर
मी दचकून जागा होतो.
आणि
तू दिलेलं आभाळ पाहतो.
 
तेव्हां
गाळात असतं आभाळ...
आणि माझा सूर्य, माझी चित्र...
माझ्या चांदण्या...माझा चंद्र...
वाहून गेलेलं असतं सगळं...!!
 
मला कळत नाही
रोज रात्री मी झोपल्यावर
का रडत असतं आभाळ !
 
तू निघून गेलीस तेंव्हापासून
हे असं चाललंय माझं
माझं नाही पण
या आभाळाचंच
वाढत चाललंय ओझं....
 
१८.०६.२०१२ 

ग्रेस....मंतरणारा



तुझे शब्द आभाळाच्या काजळखोलीतून
मंतरणाऱ्या श्वासाची वाट काढत
पुढे आले ...
आज आभाळ सुनं सुनं,
संध्येचा प्रहर सुना सुना,

माणसाच्या आदिम दुःखाला
कल्पनेच्या तीरावर,
संगीताचे मुलभूत पंख
आता कोण देईल...????

करुणातूर झाडांना
सळसळत्या पानांचे दान
कोण देईल....??

कोण म्हणेल आता प्रार्थना
जळणाऱ्या क्षितीजासाठी;
कोण आईच्या उदरात जावून
शोधील तिचं सुख – दुःख...??

कुणाला शक्य आहे आता
गाईच्या हंबराला शब्दात बांधनं...?

आता गहिवर उरतील शब्दांचे फक्त
आणि आकांत तुझी आठवण काढत
वाऱ्यावर झुलणाऱ्या रानात
संध्याकाळी बुडून जातील.

तू काळाला खुडून घेतलंस...
आणि आत्ममग्न झालास
आज कायमचा ...

आता तुझ्या शब्दांच्या वाटेने
अर्थांचा सोहळा शोधत
आम्ही किती संधिकाल

सजवत रहायचे मनात....?

थांब थोडा; बोलू जरा.

थांब थोडा; बोलू जरा.

किती दिवस हा विजनवास
आणि किती दिवस उपवास
तू असा उभं रहा
उद्याची पहाट तुझी आहे.

अरुणोदयानंतर
प्रकाशाच्या लोंबत्या हातांना
शरण जा वाटलंच तर.
नुसताच उभा नको राहूस
जरा प्रकाशात ये.

तुझ्या असण्याचं अस्तित्व
जाणवू दे या जगाला जरा.
आणि कधीतरी एखाद्वेळ
अगदी एखादवेळ तरी
वेळ साधूनच
तुझ्या नसण्याने
निर्माण होणारी पोकळी
किती मोठी आहे
याचीही ओळख करून देत जा
अधूनमधून रस्त्यावर येऊन.

तुझी पावलं थकत नाहीत...
तुझे खांदे दुखत नाहीत...
हात फक्त हलके झालेत.
मुठी अगदी सैल झाल्यात....

म्हणूनच तुझ्या सर्रास आत्महत्त्या
विसरल्या जाताहेत.
कोऱ्या करकरीत कागदावर अंगठ्याचा ठसा
इतकीच का तुझी ओळख...
थांब थोडं; थांब जरा
क्षितिजाच्या कानांनी कधीतरी
ऐकेल ना ही धरा


२०.११.२०११ 

आता हमरस्त्यावर मांडून संसार

आता हमरस्त्यावर मांडून संसार
डोळ्यात विझलेला गाव घेऊन
पायांखालची जमीन शाबूत ठेवायची.
कधी भेटलेच हाताला काम
तर घामाला किंमत असते म्हणायचं.
 
नसलेल्या देवाला हाका देवून तरी
काय उपयोग ?
पाणी पापण्यात आहे...
तेवढंच आपल्या हक्काचं
 
रोज ढाळायचं
आणि मरण टाळायचं.
 
०९.०५.२०१२

उन्हाच्या गर्द छायेत

उन्हाच्या गर्द छायेत
खेडे निपचित निजलेले
भर दुपारी.

पायाखाली पोखरलेली भुई
वर आकाश वेडावलेलं
आता उघड्या रानात
खुरांची पायपीट नुसती
गवताची कधीही नाही
ना तरी
उरल्या सुरल्या रानाला
आग लागली असती.


०९.०५.२०१२

चांदणे निजताना उत्तररात्री

चांदणे निजताना उत्तररात्री
तारकांचा देश मावळताना
उशाचा दिवा मंद करून
पापण्या पांघरून घ्याव्यात
अन् डोळ्यांत जागं व्हावं वादळ
दिवसभर निवांत निजलेलं.
 
तुझी आठवण तशी अवेळी येणारी
मंदावल्या दिव्यांच्या रेषांतून
काजळाचा चिरा चिरा उजळवणारी
 
मला माहित नाही
का झालं ? कसं झालं ?
पण कळतं इतकंच की...
 
शेवटी तरी निघताना
तुझ्या डोळ्यांत दाटलेलं आभाळ
मी पहायला सगळे होते.
 
ती भूल अजून सलते आहे
रात्ररात्रभर काही ना काही
बोलते आहे.
 
०९.०५.२०१२

एकांतात मनाला लाभले देऊळ

एकांतात मनाला लाभले देऊळ
गाभाऱ्यात घुमताना हळवीशी शिळ

पायरीशी कुणी का थांबले उगाच
कुणाच्या गं पायी आज रुतलेली काच

वेच गोवऱ्या दुपारी हलताना वारा
हलू दे थोडासा मध्यान्हीला पारा

पदराची गाठ सये सोडूच नकोस
कुणी सांगेल का कधी येईल पाऊस

०९.०५.२०१२

  

आंबा पाडाला आला.

पळसफुलांनी बहरलेल्या
या 
उजाड रानात
बाभळ...
निष्पर्ण झालेली.
कडूनिंबाला
 पालवी फुटलेली.
आणि तू...
हिरव्यागार जांभळीच्या सावलीत...
झोके घेताना...

..................
.................
आंबा पाडाला आला.


०९.०५.२०१२