संध्याकाळ विरघळून गेली चहाच्या कडू गोड घोटात
पाहट साखरझोपेत नाही झोपेतच गेली निघून
दिवस सारा कसा आणि कधी निघून जातो
हे कळतही नाही कधी...
रात्र उरल्या सुरल्या गोष्टींची जुळवणी करण्यात
निसटून जाते फुलपाखरासारखी ...
रात्ररात्रभर जागून काय शोधायचो मी पूर्वी ?
संध्याकाळी वाहत्या पाण्याच्या साक्षीत
उमलत्या ताऱ्यांना कुठचे प्रश्न विचारायचो ?
रविवार सारा निवांत म्हणून खूप भटकून
थकून भागून परतायचो का उशिराने ?
अन् अधल्या मधल्या सुट्टीत
उगाच अवघडायचो का ?
आधी पुस्तकातल्या एखाद्या पात्रात
नकळत किती गुरफटून जायचो.
आताशा स्वतःतच कीती विस्कटून गेलोय.
हल्ली सकाळी आरशात पाहून घेतो स्वतःला
तेवढंच काय ते स्वतःकडे लक्ष देणं.
बाकी तो हरवलेला मोकळा वेळ
सापडत नाही सहज कुठेही
पूर्वीसारखा !!
- गजानन मुळे
मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३
मोकळा वेळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!