बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

जिवंत


“ अमक्यानं हे अस्सं केलं...
तमक्यानं ते तस्सं केलं...
अमक्या ठिकाणी हे असं घडलं...
ते तसं घडलं...”

असलं काही आम्हाला सांगत नका बसू.
आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला
आमचं फक्त एकच ऐका...की...
‘ आम्हाला ऐकायचं नाहीय काहीच ‘
समजा की आम्ही बहिरे आहोत.
साफ म्हणजे अगदी पूर्ण बहिरे.
कंठाळीत लगावल्या सारखे.

“ ते पहा हे काय चाल्ललंय...
या इथे या पवित्र जागेत...
हे काय चाल्ललंय ..
.. बघा... तुमच्या डोळ्यांदेखत...!”

हे पहा...
आम्ही काहीच पहिलं नाही.
आम्हाला काहीच दिसलं नाही.
तुम्ही आम्हाला उगाच काहीतरी
दाखवण्याचा प्रयत्न करत आहात... बळजबरीने.
हे इकडे बघा
या डोळ्यांवर कातडं ओढलंय आम्ही.
त्यामुळे आम्हाला काहीच दिसत नाही.
आम्ही चक्क आंधळे झालोय.
त्यामुळे आम्हाला तुम्ही काहीही दाखवू नका.
आम्हाला काहीच दिसत नाही.
आणि आम्ही दिसूही देत नाही कधी.
आम्ही बाहेर पडतो तेंव्हा
झापड लावून घेतो...
घोड्याला लावतात तशी.
त्यामुळे आम्हाला दिसतो तो
फक्त आमचा...
आमच्यापुरता रस्ता.
त्या रस्त्यात काहीच विपरीत घडत नाही कधीच.
.. माफ करा आम्ही आंधळे आहोत.

“ आहो हे काय बोलताय तुम्ही
खरंतर तुम्हीच आवाज उठवायला हवा
या सगळ्या गोष्टींबाबत. “

एक्सक्युज मी ...
ही असली भाषा आम्हाला जमत नाही.
आम्ही फक्त आम्हाला वाटेल आणि
सर्वांना पटेल असं बोलतो.
ललकाऱ्या, घोषणा, ब्रीद वगैरे
आम्हाला जमत नाही काहीच.
आमच्या जिभेला हाड नाही खरं...
म्हणून आम्ही ‘हाडा‘ चे वगैरे
कोणी नाही होऊ शकत.
त्यामुळे आम्हाल असलं काही
बोलायला सांगू नका.
हं आम्ही वारेमाप स्तुती करू तुमची.
इतकी की तुम्ही तरंगायला लागाल.
आणि आम्ही सहजच निसटून जाऊ...
तुमच्या समोरून किंवा खालून.
आम्हाल आमची जीभ छाटून घ्यायची नाही.
म्हणून आम्ही बोलत नाही ब्र सुद्धा.
आम्ही मुकेच आहोत म्हणा ना !

“ आहो वेदनांची जाणीव नसेल होत कदाचित
पण तुमच्यात काही संवेदनातरी आहे की नाही “
हे पहा...
आमच्या शरीरात चेतापेशी आहेत...
चेतासंस्था आहे...
हे खरं आहे.
पण वैज्ञानिकदृष्ट्या.
पण आम्ही आम्हाला महत्प्रयासाने घडवलंय.
आमच्यात संवेदनांचा खून करण्याची ताकद आहे.
तेवढी पुरेशी आहे जिवंत राहण्यासाठी.
याउपरही तुम्ही काही सांगू... समजावू इच्छित असाल
तर साफच सांगून टाकतो तुम्हाला...
की आम्ही ठार मेलेलो आहोत.

सरणावर येणाऱ्या मरणाची
अपेक्षा फक्त जिवंत आहे आमच्यात.

-    गजानन मुळे

join ithis     free marathi e book on facebook

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

ओलावल्या वाळूवरून ही चालताना पावले

ओलावल्या वाळूवरून ही चालताना पावले
थकुनी भागुनि आली किनाऱ्याला वादळे

पत्थरांचा मुलुख मी ओलांडला केंव्हा कधी
त्या साऱ्या वादळांची आठवणही नाही साधी

चिरा आता पावलातील फक्त बोलतात थोड्या
हुंद्क्यांच्या किनाऱ्याशी दुःखाच्या जून होड्या

गर्दीत कधी हरवलेले मी सूर सारे शोधताना
सापडल्या विखुरलेल्या गुढ काही मुग्ध ताना

मागे ते पडले कधीच गाव माझे सांजेचे
आता फक्त हातावर मुके बोल गाजेचे

जाताना मी तसा बोललो ना तुला काही
निघताना पावलांशी रुसलेल्या दिशा दाही


- Gajanan Mule
http://www.facebook.com/groups/marathiebook/

मोकळा वेळ




संध्याकाळ विरघळून गेली चहाच्या कडू गोड घोटात
पाहट साखरझोपेत नाही झोपेतच गेली निघून
दिवस सारा कसा आणि कधी निघून जातो
हे कळतही नाही कधी...
रात्र उरल्या सुरल्या गोष्टींची जुळवणी करण्यात
निसटून जाते फुलपाखरासारखी ...

रात्ररात्रभर जागून काय शोधायचो मी पूर्वी ?
संध्याकाळी वाहत्या पाण्याच्या साक्षीत
उमलत्या ताऱ्यांना कुठचे प्रश्न विचारायचो ?
रविवार सारा निवांत म्हणून खूप भटकून
थकून भागून परतायचो का उशिराने ?
अन् अधल्या मधल्या सुट्टीत
उगाच अवघडायचो का ?
आधी पुस्तकातल्या एखाद्या पात्रात
नकळत किती गुरफटून जायचो.

आताशा स्वतःतच कीती विस्कटून गेलोय.
हल्ली सकाळी आरशात पाहून घेतो स्वतःला
तेवढंच काय ते स्वतःकडे लक्ष देणं.

बाकी तो हरवलेला मोकळा वेळ
सापडत नाही सहज कुठेही
पूर्वीसारखा !!

- गजानन मुळे