मैखाना
आपलं हे जग
टोकदार होत चाललेल्या काळाचे बोथट विचार
प्रसव वेदनांनी विव्हळत.. जळत राहणारी
संम्भ्रमाच्या कुशीत निजलेली ही भयाण रात्र
मेजावरच्या पेल्यात मिसळलेले
भविष्य - भूतकाळाचे असंख्य पंखछाटले पक्षी
जखमांच्या किनार्याशी पहुडलेल्या
....काही हुल्लड साउल्या
....अल्लड विचार
आता आपणच आवरायला हवं
आपलं हे जग
उद्याही चालायचं आहे मग
पावलांना बांधून रस्ते
...न दिसणाऱ्या दिशेचा दिशेने
....संध्याकाळ होईपर्यंत
या सुंदर थकल्या स्वप्नांची थैली
काखोटीला मारून
"हा रस्ता अटळ आहे
अटळ आहे घाण सारी " म्हणत
पण आज... आत्ताची वेळ
फक्त माझ्यापुरतीच ...
... थोडी सरलेली
थोडी उरलेली
गाऊ देत अंगाई
जरा या उरातील वादळांसाठी
मग्नातून उठू देत भग्नांचेही मिनार
सुटू देत ग्रहण उजेडाचे क्षणभर
.....निघू नंतर
बस्सं....!
हा शेवटचाच पेग
स्वतःच्या शेवटासाठी
बधीराच्या भुंग्यांच रव
आजून सुरु व्हायचाय
पाहायचाय मला माझाच चेहरा
आर्काचा तवंग होऊन फेसाळलेला
बुडबुडयांसम उसळलेला
गाव दूर ...दूर ...
स्वप्न चूर ...चूर..
पहाटेचा गंधगार स्वप्नील अरुण
डोळे येण्याआधी भरून
ही मैफिल ...अनोळख्यांची
ही सोबत ...नसणार्यांची
विझलेल्या या ओळी
निजलेला मैखाना
थोडेसे श्वास
आणि न दिसणाऱ्या क्षितीज्यावरून
तिने दिलेल्या आर्त हाका
मित्रा.....!
आता मला निघायलाच हवं...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!