रविवार, १९ जानेवारी, २०१४

इतकेच सांगणे आहे माझे !



हिंदूं भगव्या झेंड्याखाली एकत्र आले.
मुस्लीम प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र आले.
तसे जैन, बौद्ध, शीख, इसाई ...
आपापल्या विचारांची पताका घेऊन जमतात हल्ली कुठे कुठे.
 
त्यानंतर ... त्यांच्यातल्या त्यांच्यातच
जातीपातीच्या भिंती उभ्या ठाकतात आपोआप.
हे सारं विस्कटून कधी कधी
भाषा, प्रांत, प्रदेश अशा दुबळ्या संवेदनांचा
अनाठाई अभिनिवेश बाळगत
ते सारे जमतात एखाद्या ठिकाणी
आणि गर्दीतून जाणवून देतात
आपल्या प्रौढ मतदारांची लांबलचक यादी.
 
मग त्यांचे तथाकथित नेतृत्व येते उदयाला
मग केंद्रापासून राज्यापर्यंत सुरु होते जपणूक मतांची
शेवटी हा देश माणसांचा नाही मतांचा आहे.”
हे अधोरेखित केले जाते परत एकदा.
एक सर्वसामान्य भारतीय म्हणून
ज्याच्या त्याच्या उपासना व श्रद्धेचा मार्ग
ज्याला त्याला लखलाभ असो.
हीच अपेक्षा होती उद्याच्या उज्वल राष्ट्राचे
स्वप्न पाहणाऱ्या आशादायी नेत्रांची.
 
परंतू,
अशा तकलादू पायांवर उभे करत आहोत आपण
आपले राज्य, प्रदेश, आणि आपला देश...
याचे भान ठेवावेच लागेल आपल्याला.
ना तरी हळूहळू सारेच साऱ्यांना ओळखू लागतील
जात...धर्म...भाषा...प्रांत...पंथाच्या नावाने
आणि एक दिवस असा येईल...
की “एक भारतीय नागरिक”
ही आपली सर्वमान्य ओळख
आपण गमावून बसू या कोलाहलात.
 
इतकेच सांगणे आहे माझे
हे सर्व सताड उघड्या डोळ्यांनी
निर्धास्तपणे पाहणाऱ्या आजच्या पिढीला.
 
इतकेच सांगणे आहे माझे !
इतकेच सांगणे आहे माझे !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय वाटतं ... तुम्हाला ?.....!